प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बरेच आव्हानात्मक प्रसंग येतात. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की, त्यावर मार्ग काढता काढता त्या व्यक्तीला नैराश्य येऊ लागतं. नैराश्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अगदी सेलिब्रिटीसुद्धा या परिस्थितीपासून दूर राहू शकले नाहीत. करण जोहर, दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन या सेलिब्रिटींनीही त्यांच्या आयुष्यात नैराश्यामुळे बऱ्याच नकारात्मक गोष्टींचा सामना केला होता. याच सेलिब्रिटींमध्ये आता अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या नावाचाही समावेश झाला आहे.

चित्रपटसृष्टीत आपल्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता आणि कशा प्रकारे आपल्या मनात नकारात्मक विचार येत होते, याविषयीचा उलगडाही तिने केला. ‘मेंटल हेल्थच्या २१ व्या वर्ल्ड काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती. ‘बऱ्याचदा लहानसहान गोष्टींमुळे माझ्या मनात संकोचलेपणाची भावना यायची. त्यावेळी माझ्या अंगकाठीमुळे मला बऱ्याच गोष्टी सतावत होत्या. माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड होता. मी त्यावेळी खूपच हताश असायचे. कारण त्यावेळी मला कल्पनाच नव्हती की, मी नैराश्य आणि ‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ने ग्रासलेले होते. त्यावेळी लोकांनी माझा स्वीकार करावा असेच मला वाटत होते. माझ्या विचारांची चक्र वेगळ्याच वाटेवर फिरत होती. इतकेच नव्हे तर मी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता’, असे इलियाना म्हणाली.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

चुकीचे पाऊल उचलण्याचा विचार करणाऱ्या इलियानाने यावेळी तिचा वेगळा दृष्टीकोनही मांडला. ‘ज्यावेळी मी स्वत:चा स्वीकार करण्यास सुरुवात केली तेव्हा कुठे परिस्थिती सुधारली. एखाद्या टप्प्यावर आपल्याला नैराश्य येत असल्याचे लक्षात येताच यावर योग्य तो उपचार करण्याची गरज असते ही बाब जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण, एका दिवसात नैराश्यातून बाहेर येता येत नाही. प्रत्येक व्यक्तीत काही उणीवा असतात. त्यामुळे प्रत्येक दिवशी ही परिस्थिती सुधारत असते’, असे इलियाना म्हणाली.