अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर आजही अनेकांना विश्वास बसत नाही की त्या आपल्यात नाहीत. एकाएकी त्यांची ही अशी एक्झिज चाहत्यांना जितका धक्का देऊन गेली तितकाच किंबहुना त्याहून कैक पटींनी मोठा दु:खाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला होता. आजही या आघातातून त्यांचे कुटुंबिय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य म्हणजे श्रीदेवी यांचं जाणं त्यांच्या मुलींवर म्हणजे जान्हवी आणि खुशीवर एक मोठा आघात करुन गेलं.

जान्हवी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणच्या तयारीत असल्यामुळे त्यावेळी तिला तिच्या आईचा मोठा आधार होता. पण, पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच आईच्या निधनाची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली आणि गोष्टी जणू आपल्या हातातून निसटत आहेत असंच तिला वाटत होतं. आपल्या याच अनुभवाविषयी जान्हवीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘धडक’च्या प्रसिद्धीच्या निमित्ताने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधतेवेळी तिने आपलं मन मोकळं केलं. ”आईच्या निधनाचा धक्का पचवणं माझ्यासाठी तितकं सोपं नव्हतं. माझ्या कामामुळे आणि कुटुंबामुळे मला या प्रसंगाचा मोठ्या धाडसाने सामना करण्याची ताकद मिळाली. धडकसाठी त्यावेळी जर मी काम करत नसते तर कदाचित मला ते सर्वकाही हाताळणं अतिशय कठिण होऊन बसलं असतं. त्यामुळे ‘धडक’नेच मला सर्वतोपरी वाचवलं”, असं जान्हवी म्हणाली.

वाचा : जान्हवीला नेमकी कोणत्या गोष्टीची चिंता भेडसावतेय? 

चित्रपटसृष्टीत काम करण्याचं स्वप्न अगदी सुरुवातीपासून पाहणाऱ्या जान्हवी कपूरसाठी ‘धडक’ हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आहे, असं ती सांगते. त्याशिवाय आपल्या आयुष्यात श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं ती न विसरता नमूद करते. येत्या काळात जान्हवी कपूर तिच्या आईप्रमाणे म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांच्याप्रमाणे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोशल मीडिया आणि चित्रपटवर्तुळात जान्हवीवर खिळलेल्या अनेकांच्या नजरा आणि दिवसागणिक वाढणारा तिचा चाहतावर्ग या सर्व गोष्टी तिला या कलाविश्वात खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख देत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.