हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज असणाऱ्या जान्हवी कपूरने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरुवात केली आहे. शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धडक’च्या निमित्ताने ती शाहिद कपूरचा भाऊ, इशान खट्टर याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. जान्हवी स्वत: तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे. असं असलं तरीही काही गोष्टींची चिंताही तिला भेडसावत आहे. सर्व काही सुरळीत सुरु असताना आता जान्हवीला कसली बरं चिंता, असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करु लागलाय ना?

खुदद् जान्हवीनेच या प्रश्नाचं उत्तर ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना दिलं आहे. एखाद्या कलाकाराच्या वाट्याला येणाऱ्या यशाची अनेकदा शाश्वती नसते. मुळात कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या वाट्याला येणारं यश हे जितकं महत्त्वाचं असतं, तितकच अपयश आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियासुद्धा त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जान्हवीसुद्धा सध्या या सर्व गोष्टींचा विचार करत आहे.

एक कलाकार म्हणून आपल्या वाट्याला येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांचा आपल्यावर सहाजिकच परिणाम होतो, असं तिने स्पष्ट केलं आहे. ‘हो अर्थात या सर्व गोष्टींचा माझ्यावर परिणाम होतो. पण, जर मी जीममधून बाहेर येताना कशी दिसते या विषयावरुन ते माझी निंदा करणार असतील तर मला त्याची फारशी काळजी नाही. पण, आता मात्र मी बऱ्याच गोष्टींविषयी जास्त चिंता करु लागली आहे, या गोष्टींविषयी जास्त विचार करु लागले आहे. कारण, या क्षणाला मी योग्य आणि बरोबर पावलं उचलणंच अपेक्षित आहे ना? प्रेक्षकांनी माझ्यावर नेहमी प्रेम करावं असंच मला वाटतं’, असं जान्हवी म्हणाली. प्रेक्षक वर्गाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांचा ती गांभीर्याने विचार करते हेच जान्हवीच्या वक्तव्यातून स्पष्ट होत होतं.

Dhadak Movie : ‘धडक है ना…’च्या निमित्ताने अजय गोगावलेच्या आवाजात पुन्हा ‘सैराट’ प्रेमाची जादू

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘धडक’च्या ट्रेलरला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दलही तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोबतच ज्यांना हा ट्रेलर आवडला नाही, त्यांना चित्रपट नक्की आवडेल आणि त्यांचं मत बदलेल याविषयीही आपण आशावादी असल्याचं तिने सांगितलं.