अभिनेता अक्षय कुमार सहसा कोणतेही वक्तव्य करताना बराच सतर्क असतो. पण एका टेलिव्हिजन कार्यक्रमात त्याने युट्यूब आणि वेब विश्वात प्रसिद्ध असणाऱ्या मल्लिका दुआ हिच्याबद्दल एक कमेंट केली. पण, हे वक्तव्य त्याला चांगलेच अडचणीत आणणारे ठरले. ‘मल्लिका जी आप बेल बजाईये, मै आपको बजाता हूं’, असे खिलाडी कुमार म्हणाला होता. त्याच्या याच वक्तव्यावर मल्लिकाच्या वडिलांनी म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मल्लिकानेही खिलाडी कुमारच्या वक्तव्याविषयी आपल्या ब्लॉगमधून नाराजी व्यक्त करत प्रकरणाला आणखी हवा दिली होती.
आरोप-प्रत्यारोप आणि प्रश्नोत्तरांच्या या सत्रात खिलाडी कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही उडी घेतली. ट्विंकलने ट्विटरच्या माध्यमातून विनोद चुकीच्या पद्धतीने मांडू नका असे म्हणच अक्षयची पाठराखण केली होती. त्यासोबतच त्याने हे वक्तव्य कोणाला दुखावण्यासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूने केले नसल्याचेही तिने या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, या ट्विटनंतर मात्र अनेकांनीच ‘मिस फनी बोन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विंकल विरोधात अनेकांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली. सरतेशेवटी ट्विंकलने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणात आपण केलेल्या त्या कमेंटविषयी माफी मागितली आहे. मुख्य म्हणजे ही पोस्ट करताना तिने मल्लिकाच्या नावाचा उल्लेख करणे टाळले आहे.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
‘त्या प्रकरणात माझं नाव एका नेटकऱ्याच्या अनुषंगाने न घेता एका पत्नीचं वक्तव्य म्हणून गोवले गेले. भावनेच्या भरात जे काही लिहिले त्याबद्दल मी माफी मागते. माझ्या पाच वर्षांच्या मुलीचे नाव या सर्व प्रकरणात पुढे आले त्यामुळेच माझा स्वत:वरील ताबा सुटला आणि कोणताही विचार न करता मी व्यक्त झाले’, असे ट्विंकलने या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम असलेल्या ट्विंकलची ही पोस्ट पाहून सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. ट्विंकलच्या या पोस्टवर मल्लिका दुआ काय प्रतिक्रिया देणार, की या सर्व प्रकरणाला पूर्णविराम मिळणार हाच प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करत आहे.