भारतीय सुरक्षा दलातील कोणत्याही तुकडीचा अनेकांनाच अभिमान वाटतो. टिव्हीवर बऱ्याचदा सैन्यदलाचे शिस्तबद्ध संचलन सुरु असताना ‘आपणही त्या ठिकाणी देशाच्या सेवेसाठी तत्पर असतो तर…’ असा विचारही अनेकांच्या मनात घर करुन जातो. त्यातही सैन्यदलात सहभागी होणाऱ्या महिलांचे अनेकांनाच कौतुक वाटते. अशाच काही कर्तबगार महिलांच्या यादीतील एक नाव म्हणजे गुंजन सक्सेना. १८ वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये गुंजन यांचे नावही तितक्याच अभिमानाने घेतले जाते.

लढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार निर्माता दिग्दर्शक करण जोहर गुंजनची प्रोत्साहनपर शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची प्रशंसा करावी तितकी कमीच अशीच अनेकांची भावना आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

सैन्यदलात येण्याचे प्रोत्साहन आणि धाडसी वृत्ती गुंजन यांना त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाली. त्यांचे वडिल आणि भाऊसुद्धा भारतीय सैन्यदलात होते. देशसेवेत असणाऱ्या गुंजन यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९९४ मध्ये भारतीय वायुसेनेतर्फे निवड करण्यात आलेल्या २५ शिकाऊ पायलटच्या तुकडीतही गुंजन यांचा सहभाग होता. गुंजन यांची ही शौर्यगाथा आणि त्यांच्या प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी करणने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे आता या भूमिकेसाठी तो कोणत्या अभिनेत्रीची निवड करतो आणि चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी करतो याबद्दलच अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.