‘बिग बॉस मराठी’चे दुसरे पर्व नुकतेच सुरू झाले असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गॉसिप, वादविवाद आणि स्पर्धकांमधील गमतीजमती बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे वूटवरील ‘अनसीन अनदेखा’ व्हिडिओमध्ये नवीनच गोष्टी समोर येत आहेत. यातील एका व्हिडिओत माधव देवचके अभिजीत बिचुकलेच्या इतरांना जाणूनबुजून स्पर्श करण्याच्या स्वभावाबाबत नाराज होताना दिसत आहे. या वागणुकीमुळे इतरांना गैरसोयीचं वाटत असल्याचं माधव आणि दिगंबर अभिजीतला समजावत आहेत.

‘थोडं टची कमी राहिलेलं चांगलं. का माहित आहे का? काही-काही लोकांना सवय नसते, ते चिडतात,’ अशा शब्दांत माधव समजावताना दिसतो. दुसरीकडे हे ऐकून घेण्याऐवजी अभिजीत त्याचे म्हणणे परतवून लावण्याचा प्रयत्न करतो. महिला व पुरुषांना स्पर्श करण्यामध्ये किती फरक आहे, याबाबत माधव आपला दृष्टीकोन समजावून सांगणे सुरूच ठेवतो. बिचुकलेला त्याची चूक उमजून तो माधवचा सल्ला गांभीर्याने घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Bigg Boss Marathi 2: ..म्हणून मी इंडस्ट्रीत बदनाम- विद्याधर जोशी

दुसरीकडे बिग बॉसच्या घरात नवीन ग्रुप तयार झाला आहे. पहिल्या सिझनमध्ये सई लोकूर, पुष्कर जोग आणि मेघा यांचा ग्रुप होता. याचसोबत रेशम टिपणीस, सुशांत शेलार, राजेश श्रुंगारपुरे, आस्ताद काळे यांचा दुसरा ग्रुप झाला होता. आता या सिझनमध्ये किशोरी शहाणे, वीणा जगताप आणि रुपाली भोसले यांचा नवीन ग्रुप तयार झाला आहे. आता हा ग्रुप शेवटपर्यंत टिकतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.