ब्लॉकबस्टर दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री झायरा वसिम एका दुर्घटनेतून बचावल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. मुळची श्रीनगरची असलेली झायरा प्रवास करत असताना तिची कार दाल लेकमध्ये पडली. गुरुवारी ही घटना घडल्याचे समजते.

झायरा गुरुवारी कारने प्रवास करत होती. त्यावेळी कार बोलवर्ड रोडला येताच कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दाल लेकमध्ये जाऊन पडली. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, झायरा प्रवास करत असलेली कार तेथील स्थानिक नेत्याची होती. यावेळी झायरासोबत तिचा मित्र अरिफ अहमददेखील होता, असे ‘ग्रेटर कश्मीर’ने म्हटले आहे. झायराच्या कारचा अपघात होताच तेथील स्थानिक रहिवाशांनी या दोघांना दाल लेकमधून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. या अपघातात झायराला कोणतीही इजा झाली नसून तिचा मित्र काही प्रमाणात जखमी झाल्याचे स्थानिकांनी ‘आएएनएस’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

वाचा : नरेंद्र मोदींना टॅग करुन अरिजीत सिंगने विचारले, ‘कसे रोखणार बलात्कार?’

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ चित्रपटात छोट्या गीता फोगटच्या भूमिकेतून झायरा प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेकरिता तिला यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.  लवकरच ती आमिर खानसोबत आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात दिसणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. गायिका बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पण यासाठी वडिलांचा विरोध असणाऱ्या मुस्लिम मुलीची कथा यात दाखविण्यात येणार आहे. आपला आवाज जगभरात सर्वांपर्यंत पोहचावा असे या मुलीचे स्वप्न असते. तिच्या आईचाही यासाठी तिला पाठिंबा असतो. पण, तिच्या वडिलांचा या सगळ्याला नकार असतो. त्यामुळे आपल्या स्वप्नांची जाणीव झाल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी ती हिजाब घालून तिच्या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करते, असे टीजरमध्ये दाखविण्यात आले होते.

वाचा : महिला चाहत्यांमुळेच मला जास्त त्रास झाला- दिलजित दोसांज