बॉलिवूडमधली सर्वात लाडकी जोडी दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाबद्दल सुरु असलेल्या चर्चा संपत नाही तोच आता नवी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अशी की लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नची बोलणी केली असून दोघंही थाटामाटात लग्न करणार असल्याचं समजत आहे.

‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरच्या आई-वडिलांमध्ये लग्नाची बोलणी झाल्याचं  ‘मुंबई मिरर’नं म्हटलं आहे. त्यामुळे बॉलिवूडचं हे हॅपनिंग जोडपं यावर्षी लग्नाच्या बेड्यात अडकणार आहे. दीपिका आणि रणवीर कदाचित सप्टेंबर ते डिसेंबर या काळात लग्न करू शकतात. लग्न हिंदू पद्धतीनं होणार आहे पण लग्नाचं स्थळ मात्र अजूनही ठरलं नाही. कदाचित अनुष्का विराटच्या पावलांवर पाऊल ठेवत हे दोघंही डेस्टिनेशन वेडिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बी-टाऊनमधील काही सुत्रांच्या माहितीनुसार दीपिकानं लग्नाच्या खरेदीलाही सुरूवात केल्याचं समजत आहे.

वाचा : विजय मल्ल्याच्या लग्नाला एक्स किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार का ?

जानेवारी महिन्यात दीपिका आणि रणवीर सुट्टया व्यतीत करण्यासाठी बाहेर गेले होते. याचवेळी दोघांनी गुपचूप साखरपुडा आटोपल्याच्याही चर्चा होत्या. ५ जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त रणवीरच्या आईनं तिला डायमंडचा सेट आणि फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेली साडी भेट म्हणून दिली होती. दीपिका आणि रणवीरच्या नात्याविषयी सर्वांनाच माहिती असली तरीही या दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केलेला नाही. रिलेशनशिपविषयी कोणतेही प्रश्न विचारले असता त्या दोघांनीही मोठ्या कौशल्याने या प्रश्नाची उत्तरे देण्यात टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लग्नाच्या चर्चेवर दोघं काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

वाचा : शूट रद्द केल्यानंतर कपिल का म्हणतोय ‘जी नहीं करता’?