कॉमेडियन कपिल शर्माने काही काळ ब्रेक घेतल्यानंतर नवा शो सुरू केला खरा, पण या नव्या शोलाही ग्रहण लागल्याचं दिसतंय. कारण शो सुरु होऊन आठवडाही पूर्ण झाला नाही तोच कपिलने आणखी एका सेलिब्रिटीचं शूटिंग रद्द केल्याची माहिती समोर आली. या सर्व विषयावर कपिलने अद्याप कोणतंच स्पष्टीकरण दिलं नसून त्याच्या एका मित्राने शूटिंग रद्द करण्याचं कारण सांगितलं आहे.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कपिलच्या मित्राने सांगितलं की, ‘शूटिंग रद्द झाल्याचं कळताच आम्ही कपिलला फोन केला. त्याचा फोन बंद होता. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याची प्रेयसी गिन्नीच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याला काय झालं असा प्रश्न विचारला. त्यावर काहीच नाही, माझं मन नाही असं उत्तर त्याने दिलं.’

वाचा : अनिकेत विश्वासरावला लाखोंचा गंडा 

नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न विचारला असता कपिलकडून हेच उत्तर ऐकायला मिळाल्याचं त्याने सांगितलं. कपिलला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मित्रांनी खूप मदत केली होती. सर्व प्रयत्न करून आता त्यांनीदेखील हात टेकले आहेत. कपिलने यासंदर्भात त्याच्या आध्यात्मिक गुरुंशीही संपर्क केल्याचं म्हटलं जातं. मात्र, तरीही समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. आता या सर्व गोष्टींतून स्वत:ला सावरत कपिलने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी हीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे. येत्या काळात कपिल स्वत:ला यासंदर्भात काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.