संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्याभोवती काही ना काही वाद उदभवल्याचे पाहायला मिळाले. करणी सेना आणि राजपूत समर्थकांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाला होणारा विरोध आणि त्यांच्याकडून सेटवर करण्यात आलेली तोडफोड यामुळे भन्साळींच्या अडचणीत वाढ झाली. पण ‘पद्मावती’ चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि ‘घुमर’ गाणे यांना प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता भन्साळींना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकंदरीतच चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट आणखी भव्य स्वरुपात अनुभवता यावा यासाठी निर्माते ‘पद्मावती’ थ्री-डी स्वरुपातही आणण्याची शक्यता आहे.

वाचा : राष्ट्रभक्ती हृदयातच भिनलेली असावी लागते- सनी लिओनी

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचा ट्रेलर पाहून संचालक समिती फारच प्रभावित झाली. त्यामुळे प्रेक्षकांना दिग्दर्शकाच्या नजरेतून चित्रपट अनुभवता येण्यासाठी तो थ्री-डी स्वरुपातही प्रदर्शित करावा, असे समितीने ‘वायकॉम १८’च्या निर्मात्यांना सांगितले. निर्मात्यांमध्ये भन्साळी यांचाही समावेश आहे. ‘पद्मावती’चे आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरण करणारी कंपनी पॅरामाउंट हा चित्रपट तब्बल ९० देशांमध्ये प्रदर्शित करणार आहे.

वाचा : हुबेहूब दीपिकासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीला येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

ऐतिहासिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी १५५ कोटी रुपये खर्च केल्याचेही म्हटले जातंय. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.