बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आणि ग्लोबल स्टार दीपिका पदुकोणचा लंडन आणि दिल्लीच्या मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऋतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ यांचेही पुतळे आहेत. यासंदर्भात मादाम तुसाँच्या दिल्लीतल्या शाखेतून दीपिकाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
आपल्या अभूतपूर्व कामगिरीने जगभरात ओळख प्रस्थापित करणाऱ्या सेलिब्रिटींच्या मेणाचा पुतळा मादाम तुसाँमध्ये उभारण्यात येतो.

दीपिकाने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. त्याचप्रमाणे २०१८ या वर्षाची सुरुवातच तिच्यासाठी धमाकेदार राहिली. कारण ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. ३०० कोटींची कमाई करणारा हा या वर्षातील पहिला चित्रपट ठरला होता. त्याचप्रमाणे यावर्षी प्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही तिचा समावेश होता. एमईटी गाला आणि कान चित्रपट महोत्सवातील तिच्या दमदार हजेरीने सर्वांचीच मनं जिंकली.

वाचा : सनी लिओनीची बायोपिक वेब सीरिज लीक

चित्रपटांशिवाय आपल्या चाहत्यांना अशाप्रकारे उत्तम भेट देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी फार खूश आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाने दिली आहे. दीपिकाच्या लोकप्रियतेची जाणीव ठेवत मादाम तुसाँच्या लंडन आणि दिल्लीतल्या शाखेतही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या वर्षांच्या अखेरीच त्याचं अनावरण करण्यात येईल.