कपिलच्या मागे सुरू असलेली संकटांची मालिका काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. नुकताच सुरू झालेला कपिलाचा शो पुढचा एक महिना चाहत्यांना पाहता येणार नाही. कपिलच्या सततच्या शूट रद्द करण्याचा फटका चॅनल आणि निर्मात्यांना बसला असून पुढच्या काही दिवसांसाठीचे अपेक्षित चित्रीकरण झालं नसल्यानं महिनाभर हा शो चाहत्यांना पाहता येणार नाही.

२५ मार्चला कपिलच्या फॅमिली टाइम.. चा पहिला भाग प्रदर्शित झाला. ९० च्या दशकातल्या गेम थीमवर हा शो आधारला होता. अर्थात शोचा टीआरपीही चांगला होता. कपिल जवळपास सात महिन्यांनी छोट्या पडद्यावर परतला होता. कपिलची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. फक्त देशभरातच नाही तर जगभरात कपिलचे चाहते आहेत. त्यामुळे कपिलच्या नव्या कोऱ्या शोचा पहिला वहिला भाग प्रेक्षकांनी आवर्जून पाहिला. पण कपिलच्या पूर्वीच्या शोपेक्षा आताचा शो निराशाजनक होता अशीही प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला नाव न छापण्याच्या अटीवरून दिलेल्या माहितीनुसार कपिलचा शो एका महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय वाहिनीनं घेतला असल्याचं या शोशी निगडीत एका व्यक्तीनं सांगितलं आहे.

वाचा : ब्रेकअपनंतरच त्याच्या करिअरला उतरती कळा; कपिलच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

गेल्या काही दिवसांत कपिलनं वारंवार चित्रिकरण रद्द केलं आहे. तसेच सहकलाकारांसोबत सुरू असलेल्या वादामुळे कपिल तणावाखाली आहे. त्याचे पूर्वीचे सहकलाकार तसेच तथाकथित पूर्वाश्रमीच्या प्रेयसीनं कपिलवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कपिल गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली आहे. यामुळे तो चित्रिकरण रद्द करत असल्याचं म्हटलं जात आहे. कपिल नैराश्येत असल्याचंही त्याच्या काही जवळच्या मित्रांनीही कबूल केलं आहे. लागोपाठ चित्रिकरण रद्द झाल्यानं वाहिनीकडे प्रदर्शित करण्यासाठी एकही भाग नाही आहे. तसेच कपिलची परिस्थिती पाहता त्याला काही वेळ देण्याचं वाहिनीनं ठरवलं आहे. त्यामुळे एप्रिल महिना संपेपर्यंत कपिलचा नवा कोरा शो बंद ठेवण्याचा निर्यण घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

वाचा : अखेर कपिल शर्माच्या मदतीला धावली ‘भाभीजी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिलला पुन्हा एकदा काही काळासाठी छोट्या पडद्यावर पाहता येणार नाही यामुळे त्याचे चाहतेही नाराज झाले आहेत. त्याच्या मागचं शुक्लकाष्ठ लवकरात लवकर संपावं आणि त्यानं नव्या उमेदीनं पडद्यावर यावं इतकीच प्रार्थना त्याच्या चाहत्यांनी केली आहे.