देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहाय़ला मिळतो. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. अशात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह बेवारस म्हणून गंगा नदीसह इतर नद्यांमध्ये फेकून दिले जात असल्याच्या वृत्ताने खळबळ माजलीय. या वृत्तानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केलाय.

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रोने गंगा नदीतील मृतदेहांच्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकारामुळे नद्याचं पाणी दूषित होत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. फरहान अख्तरने एक व्टिट शेअर कलेय. यात तो म्हणाला, “नद्यांमध्ये आणि नदी किनाऱ्यावर आढळलेल्या मृतदेहांची बातमी हृदय पिळवटून टाकणारी आहे. हा व्हायरस एक दिवस नक्कीच संपेल. मात्र व्यवस्थेने या अपयशाची जबाबदारी घ्यायला हवीय. ” असं म्हणत फरहानने सरकारी यंत्रणेला यासाठी दोष दिला आहे.

तर अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील संताप व्यक्त केलाय. ट्विट करत ती म्हणाली, “या महामारीने माणुसकीचा खरा चेहरा समोर आणला आहे. ते तरंगणारे मृतदेह एकेकाळी जिवंत होते. ते कुणाचे आई, मुलगी, वडील, मुलं आहेत. जर तुम्ही त्या नदीकाठी असता आणि तुमची आई नदीकाठी तरंगताना दिसली असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? विचारही करू शकत नाही. राक्षस” अशी संतप्त प्रतिक्रिया परिणीतीने दिलीयं.

दोन्ही सेलिब्रिटींनी बिहारमधील या घटनेवर संताप व्यक्त केलाय. तर अभिनेता जावेद जाफरीने देखील “हे दुःखद आणि भयानक आहे.” अशी प्रतिक्रिया दिलीय.

वाचा: इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादावरून कंगना आणि इरफान पठाणमध्ये वादाची ठिणगी

याचसोबत अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर तसचं अभिनेत्री पूजा भट्टसह अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय.

काही दिवसांपूर्वीच बिहारमधील बक्सर जिल्ह्यात गंगाकाठी 40 मृतदेह आढळून आले होते. या घटनेचं वृत्त पसरताच प्रशासनाने हे मृतदेह दफन केले. मात्र या घटनेनंतर वाद चांगलाच चिघळला आहे.