कपड्यांचं उत्पादन आणि डिझाइन करणाऱ्या एका कंपनीने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे. चित्रपट प्रमोशनदरम्यान एजेटीएम (AJTM) या फॅशन लेबलचा प्रचार न केल्याने कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार श्रद्धा कपूर आणि निर्मात्यांविरोधात दाखल करण्यात आली आहे.

‘हसीना पारकर’ चित्रपटासाठी श्रद्धाचे कपडे डिझाइन केलेल्या एम अँड एम (M&M) डिझाइन्स कंपनीने मुंबई कोर्टात खासगी तक्रार दाखल केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कंपनीचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. ‘एजेटीएम- एजे मिस्त्री अँड थिया मिनहास’ या ब्रँड लेबल अंतर्गत एम अँड एम डिझाइन्स कंपनी कपड्यांचं उत्पादन करते. ‘हसीना पारकर’ चित्रपटाच्या माध्यमातून या कंपनीने पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीसाठी कपडे डिझाइन केले होते. एम अँड एम डिझाइन्स आणि स्विस एन्टरटेन्मेंटच्या निर्मात्यांमध्ये प्रमोशनदरम्यान श्रद्धा ब्रँडचा प्रचार करणार असल्याचा करार झाला होता. ‘चित्रपटासाठी निर्मात्यांना पुरवलेल्या कपड्यांच्या बदल्यात अभिनेत्री श्रद्धा कपूर ब्रँड आणि कंपनीचा प्रचार करण्याचे करारात ठरले होते,’ असे वकीलने सांगितले.

वाचा : कंगनावरील टीकेनंतर शेखर सुमन ट्रोल

श्रद्धाने करारात ठरल्याप्रमाणे ब्रँडचा प्रचार न केल्याने कंपनीला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार असल्याची पूर्ण कल्पना श्रद्धा आणि स्विस एन्टरटेन्मेंटला देण्यात आल्याचेही वकीलांनी म्हटले.

VIDEO : इलियाना डिक्रूझही होती ‘डिप्रेशन’ची बळी

दरम्यान श्रद्धाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या जीवनावर आधारित श्रद्धाचा हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.