गेल्या काही वर्षांत सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वावर वाढला आहे. लहान मुलांची निरागसता, प्रेमळ स्वभाव प्रेक्षकांनाही आकर्षित करतो. आपल्या मराठी सिनेमातील काही दिग्गज मंडळींची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरु झाली. या बालकलाकारांच्या यादीतील आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे मृणाल जाधव. पदार्पणातच एका पेक्षा एक हिट सिनेमातून तिने काम करून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मृणालने आपल्या बाबांबद्दल काही गोष्टी चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत.
आपल्या बाबांबद्दल सांगताना मृणाल म्हणते, ‘माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्यामुळे, मला त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करता येत नाही. पण जेव्हा त्यांच्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवणे मी पसंत करते. माझ्या बाबांबद्दल सांगायला गेले तर भरपूर काही आहे. खरं तर… अभिनय क्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन मला बाबांकडूनच सर्वात आधी मिळाले. आमच्या घरात याआधी कोणीच या क्षेत्रात वळले देखील नव्हते. पण बाबांनी माझी आवड लक्षात घेत, यात काम करण्याची मुभा दिली.’
वाचा : Father’s Day 2017 : बाबाच सांगत आहेत ‘आर्ची’च्या धाडसाची कहाणी
शूटींगमध्ये व्यस्त असल्याने बाबांसोबत अनेकदा पुरेसा वेळ घालवायला तिला मिळत नाही. मग अशा वेळी मृणालला काय वाटतं हे सांगताना ती म्हणाली, ‘आईपेक्षा बाबांसोबत माझी जास्त बॉन्डीग आहे. त्यांच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, ते सतत माझ्यासोबत असावेत असे मला वाटते. कधी कधी तर ते वेळ देत नाही म्हणून मी त्यांच्यावर रागावते देखील. पण तो अबोला काही वेळापुरताच असतो. माझ्या आगामी ‘अंड्या चा फंडा’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये ते माझ्यासोबत असावेत असे मला वाटत होते. पण ते प्रत्येकवेळी शक्यच होईल असे नाही, याची जाणीव मला होती. बाबांशी बोलल्याखेरीज मला समाधान लाभत नाही. माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्याचा मला फार अभिमान असून त्यांच्या कामिगिरीचा आदर्श घेऊन मी माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करते आहे.’