पिंपरी चिंचवडमध्ये सिनेमाच्या ऑडीशनसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचा दिग्दर्शकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काळेवाडी येथे रविवारी घडला. अप्पा पवार असं या आरोपी दिग्दर्शकाचं नाव असून सध्या तो फरार आहे.
रितेश देशमुखही म्हणतो ‘एक मराठा, लाख मराठा’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणीला सोशल मीडियावर सिनेमाच्या ऑडिशनची माहिती मिळाली होती. ही तरुणी पुण्यामध्ये शिकत असून काळेवाडी येथील तापकीर चौकमध्ये सिनेमाच्या ऑडीशनसाठी गेली होती. तिथे गेल्यावर दिलेल्या माहितीवर संपर्क केला असता आजची ऑडिशन रद्द झाली असून उद्या ऑडिशनसाठी येण्याचा मेसेज तिला पाठवण्यात आला.
त्यानुसार संबंधित मुलगी रविवारी ६ ऑगस्ट रोजी ऑडिशनला गेली. तिथे दिग्दर्शकाने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच तिला इतर सिनेमांत काम देतो असे खोटे आमिषही दाखवले. या प्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात दिग्दर्शक अप्पा पवार विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. तरुणी ही घाबरलेली असल्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप पोलिस अप्पा पवारचा शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.