भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वाचा, हुशार आणि चौकस मुलगा ‘फास्टर फेणे’ येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘लई भारी’सारख्या यशस्वी चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आणि जेनेलिया व रितेश देशमुख यांची ‘मुंबई फिल्म कंपनी’ पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, झी स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित व क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ चित्रपटात ‘बनेश’ उर्फ ‘फास्टर फेणे’च्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

वाचा : VIDEO ‘रमा माधव’ फेम पर्ण- आलोकचा विवाहसोहळा पाहिलात?

चित्रपटाची कथा आहे, बनेश्वरवरून पुण्यात मेडिकलची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू आणि उत्साही मुलाची म्हणजेच बनेश फेणेची. पक्षीमित्र, निसर्गप्रेमी, टेक्नॉलॉजिचा चाहता आणि सायकलपटू असलेला बनेश पुण्यात येतो तेव्हा तो, त्याची बालमैत्रीण आणि आता पत्रकार असलेल्या अबोलीला तसेच गुन्हेगारी सोडून सरळमार्गी जगायला लागलेल्या लहान मुलाला- भूभूला भेटतो. बनेश परीक्षेच्या तयारीला लागतो. परीक्षा केंद्रावर त्याची धनेश नावाच्या एका चुणचुणीत आणि हुशार मुलाशी ओळख होते. अन् दुसऱ्याच दिवशी एक अनपेक्षित घटना बनेशला मुळापासून हादरवून टाकते आणि सगळ्यांच्याच आयुष्यात एक विलक्षण गुंतागुंत तयार होते. शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असणारा निगरगट्ट वृत्तीचा अप्पा; सत्य शोधून काढल्याशिवाय चैन न पडणाऱ्या आणि संकटांना बेधडकपणे सामोरं जाणाऱ्या फेणेसमोर आव्हान म्हणून उभा ठाकतो. या जीवघेण्या शोधात फेणे यशस्वी होतो का याबद्दलचा उत्कंठावर्धक प्रवास या चित्रपटामधून पाहायला मिळेल. अप्पांच्या भूमिकेत दिसणार आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि अष्टपैलू अभिनेते गिरीश कुलकर्णी. चित्रपटाचे प्रेरणास्थान असणारे भा. रा.भागवत हेसुद्धा चित्रपटात आहेत हे विशेष आणि ही भूमिका साकारलीय ज्येष्ठ आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी.

वाचा : …म्हणून जया बच्चन आणि आराध्या एकत्र दिसत नाहीत

कथा, पटकथा आणि संवाद या माध्यमातून भा. रा. भागवतांचा सत्तर-ऐंशीच्या दशकातला ‘फास्टर फेणे’ क्षितिज पटवर्धन यांनी आजच्या काळात आणला आहे. चित्रपटात अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, पर्ण पेठे, शुभम मोरे, ओम भुतकर, अंशुमन जोशी, श्रीकांत यादव आणि चिन्मयी सुमीत अशी कलाकारांची मांदियाळी आहे.

नारबाची वाडी, क्लासमेट्स सारख्या यशस्वी चित्रपटांचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने या नव्या काळाच्या नव्या ‘फास्टर फेणे’ला पडद्यावर साकारले आहे. वेग आणि थरार असलेल्या या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचं शूटिंग तब्बल साठ वेगवेगळ्या लोकेशन्सवर पार पडलं असून, चित्रीकरणाची जबाबदारी पेलली आहे मिलिंद जोग यांनी.

‘फास्टर फेणे’ हा चित्रपट भा. रा भागवत यांना आदरांजली म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी, २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.