फिअरलेस नाडियाच्या ११०व्या जयंतीनिमित्त गुगल डुडलने तिला मानवंदना दिली आहे. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते.

वाचा : दीपिकाच्या वाढदिवसाला रणवीरच्या आईवडिलांनी दिले ‘हे’ गिफ्ट

त्या काळी फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अ‍ॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले. दुर्दैव म्हणजे उद्या नाडियाची पुण्यतिथी आहे. ९ जानेवारी १९९६ रोजी तिने शेवटचा श्वास घेतला.

नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती.

वाचा : ‘कोणत्याच चॅनलचे मालक मला भेटायला तयार नव्हते’

नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली. पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, असे तिच्या माहितीपटात दाखविण्यात आले आहे. त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेटर ट्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.