हल्लीची तरुणाई सोशल मीडिया आणि वेब विश्वात जास्त रमते. विविध संवेदनशील विषयांवर अगदी कलात्मकतेने भाष्य करत युट्यूबवर काही व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतात. त्यामध्ये ‘भारतीय डिजिटल पार्टी’ हा युट्यूब चॅनल आघाडीवर आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटय् विभागातील काही होतकरु तरुण मंडळी आणि अनुभवी कलाकारांच्या सहाय्याने ‘भाडिपा’ नेहमीच बहुविध विषयांवर आधारित व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणतं. सध्या सुरु असणारी दिवाळीची धामधूम पाहता ‘भाडिपा’ने आणखी एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

‘या दिवाळीत आम्हीपण दिवे लावलेत! या दिव्यांनी गोड हसू आपल्या चेहऱ्यावर उजळावं हीच आशा आहे’, असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘भाडिपा’च्या युट्यूब चॅनलवरही हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, सध्या अनेकांनीच तो आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत मित्रमंडळींना त्यात टॅग करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

नचिकेत पेंडसे दिग्दर्शित या व्हिडिओमध्ये शाल्व किंजवडेकर, सुनील अभ्यंकर आणि पौर्णिमा मनोहर हे चेहरे झळकले आहेत. दिवाळी सुरु होण्याच्या काही दिवस आधीपासून घरोघरी जी लक्षणं दिसतात, तिथपासून या सणाच्या निमित्ताने खरेदी करायची म्हटल्यावर तो निर्णय घेताना कशी तारांबळ उडते इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं विनोदीपण, तितकच प्रभावी चित्रण या व्हिडिओतून करण्यात आलं आहे. घरात होणारी साफसफाई, ठेवणीतले डबे बाहेर काढल्यावर ‘आपल्याकडे इतकी भांडी आहेत…?’ असा प्रश्न स्वत:लाच विचारणारं आपलं मन, घरातला पंखा स्वच्छ केल्यावर भलतान अभिमान वाटणारे बाबा, या व्हिडिओतून आपल्या भेटीला येतात. मुख्य म्हणजे व्हिडिओतूल प्रत्येक दृश्यामध्ये प्रेक्षक स्वत:ला शोधतो. त्यामुळे एका अर्थी या व्हिडिओमागचा उद्देश यशस्वी झाला आहे असंच म्हणावं लागेल.