ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बुधवारी मध्यरात्रीनंतर छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.   त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहिर केली. ओशिवरा येथील स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वाचा : अल्पपरिचय : रिमा लागू

रिमा यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टेलिव्हिजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिने एक पोस्ट शेअर करत त्यांच्याविषयीची एक आठवण सांगितली.

वाचा : रिमा ताई…. तुझी अकाली एक्झिट सुन्न करणारी

हेमांगीने लिहिलंय की, काही व्यक्तींशी आपला रोजचा संबंध नसला तरी ज्यांच्या अश्या आकस्मात जाण्यानं काही काळ सुन्न व्हायला होतं त्यातलच हे नाव! आमच्या ‘ठष्ट’ नाटकाच्या वेळी, अभिनयाचे सगळेच शिखर पार केलेल्या एवढ्या मोठ्या अभिनेत्रीने स्वतः बॅकस्टेज येऊन अक्षरशः सामान्य रसिकांप्रमाणे भारावून जाऊन त्यांच्या खास अश्या ‘हस्की’ आवाजात कौतुक करत ‘ए, काय काम करतेस गं. मला तुला काहीतरी द्यायचंय! असं म्हटलं. त्यानंतर आपले हात सारखे झटकत, ‘शी बाबा, काय देऊ गं, आत्ताच द्यायचंय’ असं अस्वस्थ होऊन हातातल्या पर्समधून १०० रुपयांची नोट काढून माझ्या हातात कोंबली. इतकच नाही तर, माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत, गोड पापा देत ‘घे, सध्यातरी हे घे’ म्हणत लाखमोलाचा आशिर्वाद मला दिला होता. मला तर वेड लागायचं बाकी राहिलं होतं. आपल्या आवडत्या अभिनेत्रीने ‘रिमा ताईंनी’ माझं काम पाहिलं आणि त्यांना ते इतकं आवडलं. कितीतरी वेळ मी त्या १०० रूपयांकडे बघत बसले होते. त्यांनी दिलेला हा आशिर्वाद आज एका फ्रेम मधे मी जपून ठेवलाय. माझ्यासाठी त्यांनी दिलेली ही दाद श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसोबत त्यांच्यातला माणूस म्हणून मोठेपणाची साक्ष देत राहते. अश्या व्यक्ती क्वचितच असतात. ज्या स्वतःच मोठेपण विसरून दुसऱ्याचं असं दिलखुलास कौतुक करतात.’