अवघ्या पाच-सहा वर्षांच्या वयात संगीत नाटकात अचानक गाण्याची संधी मिळाल्यावर तीनदा ‘वन्स मोअर’ घेणारी दीदी..वडील गेल्यावर धीराने शांत राहिलेली आणि भावंडांसाठी ‘कर्ती’ झालेली दीदी.. आपले आयुष्य सुरांशी आणि वडिलांच्या नावाशी बांधले गेले आहे याची लहानपणीच जाणीव झालेली दीदी.. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या अशा अनेक आठवणी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या तोंडून उलगडल्या.

गुरूपौर्णिमच्या औचित्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ‘दीनायन कलापर्व’ या उपक्रमाअंतर्गत ‘दीदी आणि मी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीस ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायिका राधा मंगेशकर व विभावरी जोशी यांनी लता मंगेशकर यांनी गायलेली गीते सादर केली.

वाचा : ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रीला झाली दोन वर्षे कारावासाची शिक्षा

‘बाबांचे (पं. दीनानाथ मंगेशकर) निधन झाले तेव्हा मुलांकडे पाहून माई (आई) रडली नाही, तशीच बारा वर्षांची दीदीही रडली नाही. घरात कुणी कर्ते नसल्यामुळे एक प्रकारे संसाराचा गाडा त्या लहान मुलीच्या खांद्यावर आला. पं. दीनानाथांच्या या मुलीला पोटासाठी नोकरी करावी लागली. वडील जाण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्यांच्या पश्चात एक लता मंगेशकर निर्माण होणार आहे हे उमजूनच ते हास्य उमटले असावे असे वाटते,’ अशा भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.

वाचा : तैमुरच्या ‘सुपरक्युट’ फोटोवर सगळेच फिदा

‘दीदी ५-६ वर्षांची असताना ‘स्वयंवर’ नाटकात नारदाची भूमिका करणारा नट उपस्थित राहू शकणार नव्हता. दीदीने उत्साहाने आपण ती भूमिका करू असे बाबांना सुचवले. एवढीशी मुलगी कशी गाईल, म्हणून बाबा चिंतेत होते. परंतु ‘मी वन्समोअर घेईन,’ असे सांगून दीदीने खरोखरच प्रेक्षकांकडून तीनदा ‘वन्समोअर’ मिळवला. मंचावर प्रवेश करताच ‘दीनानाथाचा जन्म झाला आहे, आता मी काय गाऊ,’ असे उत्स्फूर्त उद्गार बाबांच्या तोंडून निघाले. बाबांच्या तिसऱ्या पुण्यतिथीस पंधरा वर्षांची दीदी गाणार होती. परंतु आमच्या काकाने तिला ‘माझा भाऊ काय गायचा, तू काय गातेस,’ असे सुनावले. दीदी खूप रडली. त्या दिवशी दीदीच्या स्वप्नात बाबा आपल्याला गाणे शिकवत आहेत, असे दिसले. काका काय बोलला होता ते विसरून ती ‘वितरी प्रखर तेजोबल’ हे गाणे आत्मविश्वासाने गायली,’ अशा आठवणी हृदयनाथ मंदेशकर यांनी सांगितल्या.