‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादावरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना मिळणाऱ्या धमक्यांवर आता अभिनेते कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दीपिकाच्या शिराचा (सन्मानाचा) बचाव व्हावा ही माझी इच्छा. तिचे शरीर आणि स्वातंत्र्याचाही सन्मान व्हावा. त्याची अवहेलना करू नका. माझ्या चित्रपटांनादेखील अनेकांनी विरोध केला आहे. कोणत्याही स्वरुपाच्या वादविवादात टोकाची भूमिका घेणे हे खेदकारी आहे. जागे व्हा. विचार करण्याची वेळ आली आहे. आपण खूप काही बोललो. आता भारत मातेचे ऐका,’ असे ट्विट त्यांनी केले. हरयाणा भाजपचे मुख्य जनसंपर्क समन्वयक सूरज पाल अमू यांनी दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्यास बक्षीस जाहीर केले. त्यावर कमल हसन यांनी ही परखड प्रतिक्रिया दिली.

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांकडून त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. पण त्यानंतरही हा वाद काही संपला नाही. करणी सेनेनंतर भाजप आणि काँग्रेस नेतेही या चित्रपटाच्या विरोधात आले. सूरज पाल अमू यांनी दीपिका आणि भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापण्यातही करणी सैनिक कमी करणार नाहीत अशी धमकी दीपिकाला करणी सेनेचे महिपाल सिंह मकराणा यांनी दिली होती.

VIDEO : आई-वडिलांच्या ५३व्या लग्नाच्या वाढदिवसाला सलमानने गायलं हे गाणं

दरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला मंजूरी दिली नाहीये त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्याआधी सुप्रीम कोर्ट कोणताही निर्णय देऊन बोर्डाची उपेक्षा करु इच्छित नाही. तर दुसरीकडे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची घोषणा सोमवारी केली होती.