सोशल मीडिया आणि युट्यूब या माध्यमातून बऱ्याच कलाकारांना त्यांची कला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. अशाच एक गायिकेने सध्या तिच्या एका गाण्याने अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये वरचं स्थान मिळवलं आहे. त्या गायिकेचं नाव आहे चंद्रिका दरबारी. १८ वर्षीय चंद्रिका सध्या तिच्या ‘नो नीड’ या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. भारतीय- सर्बियन वंशाची चंद्रिका ‘रिका’ या नावानेही ओळखली जाते. तिच्या ‘नो नीड’ या गाण्याने अवघ्या काही महिन्यांमध्ये ‘बीबीसी रेडिओ १’च्या नव्या पॉप गाण्यांच्या यादीत बाजी मारली आहे.

या गाण्याच्या रिलीजनंतर अवघ्या १७ वर्षांच्या रिकाचे नाव एड शीरन, मायली सायरस यांच्या नावांसोबत तिचेही नाव घेतले गेले. २१ सप्टेंबरला तिचं ‘नो नीड’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. तेव्हापासून आतापर्यंत या गाण्याला लाखो लोकांनी पाहिलं असून ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही शेअर केले आहे. या गाण्याने पॉप संगीत विश्वात अक्षरश: धुमाकूळ घालत बीबीसी एशियाच्या ‘आर्टिस्ट ऑफ द वीक’ मध्येही स्थान मिळवलं होतं.

रिकाच्या ‘नो नीड’ या गाण्यातून एक सुरेख संदेश देण्यात आला आहे. इतरांशी नेहमीच समंजसपणे वागा, असं या गाण्यातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे त्याची चाल, शब्द सर्व काही गाण्यासाठी फायद्याचे ठरत आहेत, मुख्य म्हणजे या गाण्याची प्रेरणा रिकाला स्वानुभवातुनच मिळाली. याविषयीच ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना रिका म्हणाली, ‘शाळेत असताना माझी फार खिल्ली उडवली जायची. माझ्या वंशामुळे नव्हे तर, माझ्या चेहऱ्यामुळे आणि माझी अंगकाठी खूपच बारीक असल्यामुळे फार खिल्ली उडवली जायची. त्यामुळेच मी एका गाण्याच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाला कमी लेखण्यापेक्षा आपण स्वत:मध्ये कसा बदल करु शकतो हा महत्त्वाचा मुद्दा ‘नो नीड’ या गाण्यातून अधोरेखित करण्यात आला आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

रिकाविषयी जाणून घेण्यासाठी सध्या पॉप संगीताचे चाहते सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. त्यातही ती भारतीय वंशाची असल्यामुळे अनेकांनाच तिच्याविषयी अप्रूपही वाटत आहे. रिका, म्हणजेच चंद्रिका दरबारीची आई सर्बियन असून, तिचे वडील भारतीय आहेत. त्यामुळेच बहुविध संस्कृतींविषयी तिला नेहमीच कुतूहल वाटते.