एखादी चांगली आणि उत्तम अशी कलाकृती साकारण्यासाठी लागणारी मेहनत आणि कष्ट हे पाहणाऱ्यांना दिसून येत नाहीत. ते केवळ ते साकारणाऱ्या व्यक्तीलाच माहिती असतात. पण, आपल्या मेहनतीने तयार केलेल्या कलाकृतीची कोणी नासधूस केली तर…. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटामागचे शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीये. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्यापासूनच सेटवर करण्यात आलेली तोडफोड, भन्साळींच्या तोंडाला काळे फासणे असे काही ना काही प्रकार घडत आलेत. त्यानंतर आता एका कलाकाराने काढलेली ‘पद्मावती’च्या पोस्टरची रांगोळी विस्कटून टाकण्याचा प्रकार घडला आहे.

वाचा : अरिनच्या जन्मामुळे यंदाची दिवाळी खूपच खास- अदिती सारंगधर

करण के या कलाकाराने दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ लूकमधील रांगोळी काढली होती. या रांगोळीसाठी त्याला तब्बल ४८ तास लागले होते. पण, समाजकंटकांनी अवघ्या काही मिनिटांतच होत्याचे नव्हते करून टाकले. ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, करण हा एक अभिनेता, लेखक आहे. तसेच तो डॉक्टरकीचे प्रशिक्षणही घेतोय. १०० लोकांच्या एका घोळक्याने ‘जय श्री राम’च्या घोषणा देत माझ्या कित्येक तासांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याचे करणने म्हटलेय. त्याने दोन फोटो ट्विट केले असून, एका फोटोत पद्मावतीची सुंदर रेखाटलेली रांगोळी दिसते. तर दुसऱ्या फोटोत ती रांगोळी विस्कटल्याचे पाहायला मिळते.

वाचा : करिना आणि मी ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो, केआरके बरळला

‘पद्मावती’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच त्यात काही ना काही अडथळे येत आहेत. राजस्थानमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर तोडफोड केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी संजय भन्साळी यांच्या कानशिलातही लगावली होती. त्यानंतर चित्रीकरणाची जागा बदलूनही पुन्हा करणी सेनेकडून दोनदा तोडफोड करण्यात आली. रणवीरने ‘पद्मावती’चे पोस्टर शेअर केल्यानंतरही त्याला धमकी देण्यात आली होती. आमचे चित्रपटावर पूर्ण लक्ष असून, त्यात काही चुकीचे आढळल्यास आम्ही तुमच्या वाटेत पुन्हा अडथळे निर्माण करू, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असे आश्वासन करण जोहरला दिलंय. १ डिसेंबरला ‘पद्मावती’ सर्वत्र प्रदर्शित होईल.