गणेशोत्सवाच्या औचित्यावर आगामी ‘जुडवा २’ चित्रपटातील ‘सुनो, गणपती बाप्पा मोरया’ गाणे प्रदर्शित करण्यात आलेय. या उडत्या गाण्याला वरुण धवनच्या डान्सने आणखीनच धमाकेदार केलेय. या गाण्यातील वरुणचा डान्स आणि त्याची स्टाइल पाहता चित्रपटातील ‘राजा’च्या भूमिकेसाठी तो योग्य असल्याचे दिसून येते.
वाचा : असा साजरा करणार अक्षय कुमार त्याचा ५० वा वाढदिवस
१९९७ साली आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपटाचा ‘जुडवा २’ हा रिमेक असून, यात वरुण, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या भूमिका आहेत. वरुण यात ‘प्रेम’ आणि ‘राजा’ या दुहेरी भूमिका साकारत असून, राजावर हे गाणे चित्रीत करण्यात आलेय. गाण्यात वरूणने गणपती बाप्पाकडे एक गोड तक्रार बोलून दाखवली आहे. ‘परेशान करे मुझे छोरियाँ’ अशी तक्रार त्याने बाप्पासमोर मांडली. साजिद वाजिदने संगीतबद्ध केलेले हे गाणे दानिश साब्रीने लिहिलेय. राजा, त्याचे खास मित्र आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पामधील सुंदर नाते मांडणारे हे गाणे अमित मिश्राने गायलेय. गाण्यात वरुणचा टपोरी लूक पाहावयास मिळतोय. मात्र, तापसी आणि जॅकलिनची झलक या दोन मिनिटांच्या गाण्यात दिसत नाही.
वाचा : सैफच्या ‘शेफ’चे पहिले पोस्टर
‘जुडवा’ चित्रपट सलमानने त्याच्या अभिनयामुळे एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलेला. त्यामुळे ‘जुडवा २’कडूनही बऱ्याच अपेक्षा केल्या जात आहेत. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर आणि काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेले ‘चलती है क्या ९ से १२’ तसेच ‘सुनो, गणपती बाप्पा मोरया’ गाणे पाहता वरुण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होईल असे दिसते. तसेच, सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ‘जुडवा २’ मध्ये बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच २९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.