सलमान खान, सोहेल खान, चिनी अभिनेत्री झू झू यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्या तुलनेत समीक्षकांनी मात्र भाईजानच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. पण, तरीही पहिल्या दोन दिवसांच्या कमाईत या प्रतिसादाचे पडसाद मात्र पाहायला मिळाले नाहीत. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाने शनिवारी २१.१७ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारच्या तुलनेत हा आकडा अगदी संथ गतीने पुढे गेल्याचं पाहायला मिळालं.
तरण आदर्श यांच्या ट्विटमधून मिळालेल्या माहितीनुसार ‘ट्युबलाइट’ने पहिल्या दोन दिवसांमध्ये ४२.३२ कोटींची कमाई केली आहे. सलमानच्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारसे प्रभावी नसले तरीही ‘बाहुबली २’ नंतर पहिल्या दोन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा ‘ट्युबलाइट’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता ‘ट्युबलाइट’ने नांगी टाकली असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. कारण ईदचं एकंदर वातावरण पाहता त्या उत्साहाचा फायदा या चित्रपटाला होईल असा अंदाच काही व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.
#Tubelight Fri 21.15 cr, Sat 21.17 cr. Total: ₹ 42.32 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 25, 2017
वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…
ईदच्या मुहूर्तावर चित्रपटांच्या रुपात प्रेकक्षकांना ईदी देणाऱ्या भाईजान सलमानला यावेळीसुद्धा त्याचे चाहते निराश करणार नाहीत असं म्हटलं जात आहे. याआधी ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘किक’, ‘सुलतान’ या चित्रटांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता आता सर्वांच लक्ष ‘ट्युबलाइट’च्या कमाईकडे लागून राहिलं आहे. सॅटेलाइट राइट्स, थिएटरीकल राइट्स आणि म्युझिक राइट्स विक्रीतून या चित्रपटाला नफा झाला आहे. तेव्हा आता ४३५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट कमाईच्या बाबतीत कितपत यशस्वी ठरतो हे येत्या काही दिवसांत कळेलच.