बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन नेहमीच विविध छटांच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देते. तिचा अभिनय असलेल्या चित्रपटांमध्ये नेहमीच एक अनोखी कथा पाहायला मिळते. अशीच एक अनोखी कथा कल्की पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. तिच्या आगामी ‘रिबन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये वेब सीरीज फेम सुमित व्यासचीही मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे.

‘रिबन’मध्ये एक ‘कपल लव्ह स्टोरी’ आहे. एकीकडे प्रेम, काळजी, मौजमजा या सर्व गोष्टी नात्यांमध्ये असतानाच अडचणींचा सामना करताना एकमेकांची होणारी खरी ओळख यातून दाखवण्यात आली आहे. चित्रपटात कल्कीच्या पतीची भूमिका साकारत असलेला सुमित व्यवसायाने इंजिनियर दर्शविण्यात आला आहे. ट्रेलरमधील सुमित आणि कल्कीची केमिस्ट्री पाहता या दोघांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण होईल.

वाचा : गैरवर्तनामुळे त्याला कॉलेजमधून निलंबित केलं होतं; आदित्यच्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचं ट्विट

‘पर्मनंट रुममेट्स’, ‘ट्रिपलिंग’ यांसारख्या वेब सीरीजमधून सुमित प्रसिद्धीच्या झोतात आला. हा ट्रेलर पाहून तुम्हाला ‘पर्मनंट रुममेट्स’मधील मिकेश या भूमिकेची नक्कीच आठवण होईल. राखी शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी जोडी आता पडद्यावर कशी कामगिरी करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.