सध्या बॉलिवूडमध्ये स्त्री-प्रधान भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करत असतानाच कंगना आणखी एका चरित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करणारी पहिली दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अरुणिमा यांच्यावरील बायोपिक सलग ६० दिवसांत शूट करण्यात येणार आहे. कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची शूटिंग जयपूरमध्ये सुरू आहे. डिसेंबरमध्ये हे शूटिंग संपल्यानंतर कंगना हा पुढील चित्रपट स्विकारणार असल्याचं कळतंय. अरुणिमा सिन्हा यांच्यावरील चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार, हे पुढील महिन्यात निश्चित करण्यात येईल.

वाचा : …तर ‘परदेस’मध्ये सलमान-माधुरी दिसले असते

चित्रपटातील अरुणिमा यांच्या व्यक्तिरेखेसाठी कंगना आणि क्रिती सनॉन असे दोन पर्याय अरुणिमा यांना सुचवण्यात आले होते. मात्र, अरुणिमा यांनी कंगनाच्या नावाला पसंती दर्शविली. सुरुवातीला फरहान अख्तरने अरुणिमा यांच्याकडे चित्रपट निर्मितीच्या परवानगीसाठी विचारणा केली होती. मात्र काही कारणांमुळे त्याने नंतर माघार घेतली. कंगनाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास तिच्या करिअरमधील हा तिसरा बायोपिक असेल. कंगनाला आणखी एका स्त्री-प्रधान भुमिकेत पाहायला तिच्या चाहत्यांनाही नक्कीच आवडेल.