भारतातील दोन प्रसिद्ध कॉमेडियन्स कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी विमानप्रवासात झालेले भांडण सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. ऑस्ट्रेलियामध्ये कार्यक्रम करून भारतात परतत असताना कपिलने सुनीलला शिवीगाळ केलेली तसेच, त्याला शूजही फेकून मारल्याचे म्हटले जात होते. या सर्व प्रकारानंतर एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या कपिल आणि सुनीलमध्ये मोठी दरी निर्माण झाली. दोघांच्या वादाचा फटका अखेर ‘द कपिल शर्मा शो’ला सहन करावा लागला. कपिलने दिलेल्या वागणुकीमुळे दुखावलेल्या सुनीलने त्याच्याशी असलेले मैत्रीचे संबंध तोडले आणि दोघांचे एकमेकांशी बोलणेही बंद झाले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिलने त्यांच्यातील वादावर भाष्य केले केले. या सगळ्या वादानंतर तो मद्याच्या प्रचंड आहारी गेल्याची कबुलीही त्याने दिली.
विमानप्रवासातील वादावर ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना कपिल म्हणाला की, ‘आमच्यात काही मतभेद होते हे मी मान्य करतो आणि त्यामुळे मला खूप मोठी किंमत मोजावी लागलीय. पण, याबद्दलची माहिती अधिक फुलवून लोकांपर्यंत पोहचवण्यात आली असून, ते खोटं आहे. विमानात सर्वांच्या आधी जेवण देण्याचा हट्ट मी केला होता. त्यानंतर राग आल्यामुळे मी सुनीलला शूज फेकून मारला, असे प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले. मात्र, गेली कित्येक वर्षे तुम्ही मला ओळखता, मी असं काही करेन असं तुम्हाला वाटतं का?, असा सवाल यावेळी कपिलने विचारला.
वाचा : हसीना पारकर आणि डॅडीमध्ये होते हे कनेक्शन
या घटनेनंतर कपिलचे मद्यपानाचे प्रमाण खूपच वाढले. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर झाल्याचेही त्याने सांगितले. ‘या घटनेचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्यानंतर कारण नसतानाही मी खूप प्रमाणात दारु प्यायला लागलो. सुनील, चंदन, अली असगर हे सगळे माझे मित्र आहेत. असे कसे घडू शकते?’, असेही कपिल म्हणाला.
विमानप्रवासातील घटनेबद्दलचे सत्य सर्वांसमोर न आणून आपण खूप मोठी चूक केल्याचे कपिलला वाटते. यावर आपली बाजू मांडताना कपिल म्हणाला की, माझ्याबद्दल गैरसमज करून घेतले जात होते, तेव्हा मी स्वतःची बाजू मांडायला हवी होती. पण, सत्य सर्वांसमोर न आणून मी खूप मोठी चूक केली. माझ्या शांत राहण्याचा प्रसारमाध्यमांनी फायदा घेतला. मी एक गर्विष्ठ व्यक्ती असल्याचे त्यांनी लोकांना पटवून दिले. शूज फेकून मारणे, नखरे करून सहकलाकारांना त्रास देणे या सर्व भाकड कथा प्रसारमाध्यमांची निर्मिती असल्याचे कपिलने सांगितले.
वाचा : बॉबी डार्लिंगची सासू म्हणते, ‘माझी सून पहिलवान’
दरम्यान, कपिलने सुनीलला पुन्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत आणण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावर सुनीलने पुन्हा शोमध्ये येण्यास नकार दिला.