अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरसोबत ती पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया, कार्यक्रम आणि मुलाखतींमधून ती चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. दरम्यान, कतरिनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, हा फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्यासोबतचा कतरिनाचा फोटो सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधतोय.
मॉडेल शमिता सिंघाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या फोटोमध्ये गद्दाफीसोबत काही मॉ़डेल्सदेखील दिसत असून त्यामध्ये कतरिना कैफसुद्धा आहे. १५ वर्षांपूर्वीचा हा फोटो शेअर करत शमिताने कॅप्शन लिहिले की, ‘एका फॅशन शोसाठी १५ वर्षांपूर्वी आपण सगळे लिबियात होतो आणि गद्दाफी यांना भेटायची संधी मिळाली. मुलींनो… तुम्हाला लक्षात आहे का?’ या फोटोमध्ये अदिती गोवित्रीकर, आंचल कुमार आणि नेहा धुपियासुद्धा दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/BWUzC7ZjWZd/
हा फोटो काढला तेव्हा म्हणजेच १५ वर्षांपूर्वी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीची फार दहशत होती. गद्दाफी आपल्यासोबत महिला सुरक्षारक्षकांचा एक गट ठेवत असे ज्यांना ‘अॅमेझॉनियन्स’ असे म्हटले जायचे. ४२ वर्षांपर्यंत लिबियावर राज्य करणारे गद्दाफी यांची विद्रोहींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हा फोटो पाहिल्यानंतर कतरिनाची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वाचा : ..आणि ‘दीदीं’च्या आयुष्याचा सुरेल पट उलगडला!
कतरिना आणि रणबीरचा ‘जग्गा जासूस’ चित्रपट येत्या १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातही कतरिना भूमिका साकारणार आहे.