‘हॉट सीट’वर बसून अवघ्या काही तासांत कोट्यधीश बनवण्याची संधी देणारा सर्वाधिक लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शोच्या नवव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन या सिझनमध्येदेखील सूत्रसंचालन करणार असून शोबद्दलचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. शोसाठी आतापर्यंत तब्बल १ कोटी ९८ लाख स्पर्धकांनी रेजिस्ट्रेशन केले आहेत.

बिग बींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केबीसीचा प्रोमो शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी रेजिस्ट्रेशनची तारीखसुद्धा सांगितली होती. ‘१७ जून रात्री ९ वाजल्यापासून माझे प्रश्न आणि तुमचे केबीसी रेजिस्ट्रेशन सुरू होणार, त्यासाठी तयार राहा’ असं म्हणत सूत्रसंचालनाच्या खुर्चीवर बसलेले बिग बी आपल्या भारदस्त आवाजात रेजिस्ट्रेशनची तारीख जाहीर करताना या प्रोमोमध्ये दिसले होते.

वाचा : मुंबईतील नाईट क्लबमध्ये भेटणार शाहरूख आणि अनुष्का

१७ जूनपासून देशभरातून असंख्य लोकांचे रेजिस्ट्रेशन या शोसाठी करण्यात आले. आतापर्यंत १ कोटी ९८ लाख रेजिस्ट्रेशन झाले असून हा आकडा मागील आठ सिझनमध्ये झालेल्या रेजिस्ट्रेशनपेक्षा खूप मोठा आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या इतिहासातील रेजिस्ट्रेशनचा हा सर्वाधिक आकडा आहे. इतकंच नाही तर शेवटच्या दिवशीही ५१ लाख रेजिस्ट्रेशन झाले. ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’चे बिझनेस हेड दानिख खान यांनी म्हटलं की, ‘रेकॉर्डब्रेक रेजिस्ट्रेशनमुळे देशात केबीसीला मिळत असलेल्या प्रसिद्धीची प्रचिती येतेय. हा शो दरवर्षी भारताचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ज्ञानाच्या शक्तीला दर्शवतो.’

वाचा : महिमा चौधरीच्या भाऊ आणि वहिनीचा अपघातात मृत्यू

सहा आठवड्यांपर्यंत चालणारा हा शो सोमवार ते शुक्रवारी प्रसारित होणार आहे. शोमध्ये पैसे जिंकण्याच्या संधीसोबतच स्पर्धकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याला म्हणजेच बिग बींना भेटायला मिळते. त्यामुळे केबीसीच्या याआधीच्या सिझनप्रमाणेच नववा सिझनही जोरदार गाजेल यात काही शंकाच नाही.