ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टॉम अल्टर यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते त्वचेच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अभिनय क्षेत्राबरोबरच त्यांनी क्रीडा पत्रकारितेतही विशेष कामगिरी केली होती. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांवर चांगलं प्रभुत्व असलेल्या टॉम यांचं लेखनही वाचकांना खूप आवडायचं. त्यातही क्रिकेट या खेळावर त्यांचं फार प्रेम होतं. १९८८ मध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची पहिली व्हिडिओ मुलाखत त्यांनी घेतली होती. तेव्हा सचिन फक्त १५ वर्षांचा होता. महेंद्रसिंग धोनीने जेव्हा कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला, तेव्हा टॉम यांनी त्यांच्या लेखणीतून त्याच्यावर सडकून टीका केली होती.

‘फर्स्टपोस्ट’साठी लिहिलेल्या लेखात त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तीन वर्षांपूर्वी जेव्हा धोनीने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली, तेव्हा सर्वांनाच त्याच्या या निर्णयाने धक्का बसला होता. ३० डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सामना ड्रॉ झाल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी टॉम अल्टर यांनी धोनीवर एक लेख लिहिला होता. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका संपण्यापूर्वीच धोनीचा संन्यास घेण्याचा निर्णय खूप चुकीचा आहे. यासाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्यावर त्याला बंदी घातली पाहिजे. करारासोबतच त्याने लोकांचा विश्वासदेखील तोडला आहे. त्याने कोणाचीही पर्वा केली नाही कारण तो कॉर्पोरेट जगाचा आवडता आहे, बॉसचा आवडता आहे. त्याच्यासाठी जिंकणं किंवा हरणं महत्त्वाचं नाही,’ असं त्यांनी या लेखात लिहिलं होतं. धोनीसाठी फक्त ब्रँड आणि पैसाच महत्त्वाचा आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी या लेखात केली होती.

VIDEO : टॉम अल्टर-सचिन तेंडुलकरची ‘ती’ ‘ग्रेट भेट’

हरयाणातील सेंट थॉमस स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच, क्रिकेटची विशेष आवड असल्याने ते तेथे क्रिकेट प्रशिक्षकही झाले होते. त्याचवेळी आपल्या लेखनातून ते क्रिकेटविषयी मतं व्यक्त करत राहिले. ‘स्पोर्टसवीक’, ‘आऊटलूक’ आणि ‘डेबोनायर’ यांमध्ये त्यांचे लेख छापून यायचे.