अभिनेता सुशांत सिह राजपूत आणि क्रिती सनॉन यांच्यात प्रेम बहरत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड वर्तुळात रंगताना दिसत आहेत. ही जोडी ‘राबता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अयशस्वी ठरला, मात्र त्यानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आली. दोघे अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. अलिकडेच क्रितीला पुन्हा एकदा सुशांतच्या घराजवळ पाहिले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, क्रितीने सुशांतच्या घरापासून काही अंतरावर तिची कार पार्क केली. प्रसारमाध्यमांपासून लांब राहण्यासाठीच तिने असे केले असावे. सुशांतच्या घरी जवळपास ती दोन तास होती. फोटोग्राफर्सच्या नजरेत येऊ नये याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती.

वाचा : इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना ‘टाइम बॉम्ब’सारखी वागणूक दिली जाते- अक्षय कुमार

काही दिवसांपूर्वी क्रितीला सुशांतसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली होती की, तुम्ही ठरवून कोणत्याही नात्याची सुरुवात करु शकत नाही, सध्यातरी मी ‘सिंगल’च आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये.’ असे सांगून तिने सुशांतसोबतच्या प्रेमसंबंधांच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये काय शिजतंय, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल.