पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. काल (सोमवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी लॉकडाउनच्या मुद्दयावर चर्चा केली होती. त्यामुळे आज ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान अभिनेता कमाल खानने मोदींच्या भाषणाचा धसका घेतला आहे. त्याने ट्विट करुन आपली भीती व्यक्त केली आहे.

“पंतप्रधान मोदीजी पुन्हा एकदा रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देवा आमच्यावर कृपा कर. कारण जेव्हा कधी ते रात्री टीव्हीवर येतात तेव्हा देशवासीयांच्या पायाखालची जमीनच सरकते.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

अवश्य पाहा – PHOTO : करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद

अवश्य वाचा – कौतुकास्पद! कर्ज काढून अभिनेत्याने दिला कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांचा पगार

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो अनेक कलाकारांवर टीका करत असतो. यावेळी त्याने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज्यांमध्ये लॉकडाउन कसा हाताळणार याची व्यापक रणनीती तयार करा आणि त्याची माहिती १५ मे पर्यंत द्या अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीदरम्यान केली होती. सध्या देशात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात लॉकडाउन असला तरी करोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.