भरभरून हसवणारे सिनेमे, भन्नाट दिग्दर्शन, आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून केदार शिंदे याची ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये केदार शिंदे हे नाव अगदी आदराने घेतलं जात. केदार शिंदे म्हटलं तर कॉमेडी आलीच. आता याच भन्नाट कॉमेडीच्या संकल्पनेसोबत केदार हिंदी मालिका घेऊन येत असून मालिकेचे नाव ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ असे आहे.

वाचा : आता सलमानसोबत ‘रेस’ लावणार अमिताभ बच्चन

दिग्दर्शक केदार शिंदेने मराठीमध्ये अनेक सिनेमे आणि नाटकांचे दिग्दर्शन केलं आहे. त्याची हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ ही पहिली मालिका लोकांच्या भेटीला येतेय. एक आई आपल्या मुलासाठी सर्वगुण संपन्न अशा वधुच्या शोधात असते आणि या दरम्यान ती आपलं मागणं देवाकडे मांडते . भगवान शिवजी त्या आईच्या प्रार्थनेतून प्रसन्न होतो आणि पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या वधूंचा आशीर्वाद देतो. आता या सर्व गोंधळामध्ये बिचाऱ्या मुलाची काय अवस्था होते याची विनोदी कथा म्हणजे ‘क्या हाल मिस्टर पांचाल’.

वाचा : ‘जुडवा २’ गाणे, ‘सुनो, गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरियाँ..’

विनोदी कथांसाठी केदार शिंदे अगदी माहीर आहे यात काही वाद नाही. त्याची ही पहिलीवहिली हिंदी मालिका असल्यामुळे सगळं नव्याने सुरु करण्यातही एक वेगळी मजा येत आहे असं तो म्हणतात. याविषयी केदाल म्हणाला की, ‘ही मालिका माझ्यासाठी जितकी नवी आहे तितकी सर्व कलाकारांसाठी सुद्धा नवी आहे. इथे काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या आधीच्या मालिका व सिनेमांमध्ये गंभीर भूमिका केल्या आहेत. या सर्व कलाकारांना विनोद शिकवणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे काम करण्यात सुद्धा तितकीच मजा येतेय.’
केदार शिंदे दिग्दर्शित तसेच विपुल शाह आणि ऑप्टोमिस्ट्रीक्स प्रोडक्शन निर्मित ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ मालिका २८ ऑगस्ट २०१७ पासून स्टार भारत वाहिनीवर सुरु झालीये.