अभिनयाच्या वेडापायी घरदार सोडून मुंबईत आले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या. पण जोवर अभिनेता म्हणून नावारुपास येत नाही तोवर लग्नच करणार नाही, असा पण केलेला एक अभिनेता आहे… शरद जाधव! मराठीतला नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणून एकांकिका चळवळीत ओळखला जाणारा शरद ‘घुमा’ या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारतोय. फोक्सवॅगनच्या जर्मन, फेसबुकच्या अमेरिकन आणि पोलंडच्या मॉलच्या जाहिरातीत झळकलेल्या शरदने काही तेलगू जाहिरातींमध्येही काम केलेय. शरद गेली १५ वर्षे नाटक, जाहिरात आणि सिनेमात अभिनयाच्या जोरावर मुख्य भूमिका मिळावी म्हणून धडपडतोय. परंतु, छोट्या-मोठ्या भूमिकांवरच त्याला आजवर समाधान मानावं लागल्याने त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या ३४व्या वर्षीही तो अविवाहीत आहे.

वाचा : कुलदीप यादवला ‘या’ अभिनेत्रीसोबत निर्जन बेटावर ‘डेट’वर जाण्याची इच्छा

मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा- खडले परमानंदचा शरद अभिनयाच्या वेडापायी शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात आला आणि टेक्सास गायकवाड यांच्या प्रबुद्ध रंगभूमी संस्थेतून एकांकिका-नाटकातून काम करू लागला. बऱ्याच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकातून त्याने छोटी-मोठी कामं केली. फोक्सवॅगन, फेसबुक सारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीही केल्या. परंतु स्वत:चं पोट भरण्याची भ्रांत झालेल्या शरदला घरातून विरोध होऊ लागला. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्याचं लग्न लावून देऊ मग सुधरेल या भाबड्या आशेपायी मुली पाहायला सुरूवात केली. आता आपल्याला कुठेतरी नोकरी करावी लागणार आणि आपलं ध्येय संपणार! यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शरदने घरच्यांना लग्न करेन पण अभिनेता म्हणून नावारूपास येऊनच करेन, असं ठणकावून सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत शरद अविवाहीत आहे. पण, आता ‘घुमा’ या सिनेमात त्याला हिरो म्हणून भूमिका मिळाली आहे.

वाचा : Padmavati शाहिदच्या महारावल रतन सिंह लूकसाठी लागले चार महिने आणि २२ कारागीर!

आपल्या हुशार मुलाला जिल्हापरिषदेच्या शाळेतून काढून इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या एका शेतकरी बापाची ’नामा’ची प्रमुख भूमिका शरद साकारतोय. या चित्रपटाची गोष्ट ही ‘नामा’ या व्यक्तिरेखेभोवती फिरते त्यामुळे शरद या चित्रपटाचा खरा हिरो आहे. आता मायबाप प्रेक्षकांच्या कृपाशिर्वादाने घुमा ला घवघवीत यश मिळू दे आणि माझ्या लग्नाकडे डोळे लावून बसलेल्या माझ्या आईबाबांचं स्वप्न आणि माझा कलेप्रती केलेला त्याग फळू दे! अशी आशा शरद जाधवने व्यक्त केली.