अनेक विरोधांना सामोरे गेल्यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. १९७५ ते १९७७ यादरम्यान देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे. यातील किर्ती कुल्हारी आणि नील नितीन मुकेश या मुख्य कलाकारांच्या अभिनयाची अनेकांनी स्तुती केली. त्यानंतर आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. नॉर्वे येथील बॉलिवूड फेस्टिव्हलमध्ये ‘इंदू सरकार’ चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मधुर भांडारकर यांना मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

नॉर्वेच्या सांस्कृतिक मंत्री लिंडा कॅथरिन यांच्या हस्ते भांडारकरांना हा पुरस्कार देण्यात आला. हा फोटो पोस्ट करत त्यांनी किर्ती कुल्हारी, नील नितीन मुकेश, अनुपम खेर आणि तोता रॉय चौधरी यांना टॅग केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर हा चित्रपट असल्याने देशभरातून याला विरोध झाला होता. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता. लखनऊ, अलाहाबाद या ठिकाणी भांडारकर यांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळण्यात आले होते.

वाचा : आता फुटबॉलच्या मैदानातही दिसणार सनीची जादू

‘इंदू सरकार’च्या प्रमोशनवेळी सामोरे जावे लागलेल्या विरोधानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना भांडारकर म्हणाले होते की, ‘पुणे आणि नागपूरमधील निदर्शनाचे स्वरुप भयानक होते. पंचतारांकित हॉटेलमध्ये आंदोलनकर्ते शिरले आणि घोषणा देऊ लागले होते. एखाद्या चित्रपटासाठी राजकीय पक्षांनी अशा स्वरुपाचं आंदोलन करणे चुकीचे आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जरी हा चित्रपट असला तरी यातील अनेक घटना काल्पनिक आहेत.’