‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुचा दहावीचा निकाल आता समोर आला आहे. रिंकूने दहावीच्या परीक्षेत पाचशेपैकी ३२७ गुण मिळवले आहेत. तिला प्रथम श्रेणी मिळाली असून, तिने ६६.४० टक्के गुण मिळवले आहेत. रिंकूच्या निकालाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं असून, तिच्या आईचं नाव आशा आहे.

वाचा : दहावीच्या परीक्षेतही ‘सैराट’च्या आर्चीची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी

फक्त एका महिन्याच्या कालावधीत अभ्यास करुन रिंकूने परीक्षेत मिळवलेले यश प्रशंसनीय असल्याची भावना तिच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. सध्या रिंकूचे कुटुंब बाहेरगावी गेले असून त्यांच्या प्रतिक्रिया कळलेल्या नाहीत. सैराटनंतर रिंकू याच चित्रपटाचा रिमेक असलेल्या मनसु मल्लिगे या कन्नड चित्रपटामध्ये काम करत होती. दहावीचे वर्ष पुन्हा नव्या चित्रपटाचे काम या दोन्ही गोष्टींमध्ये तिने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या या प्रयत्नाला आज यश मिळाले आहे.

गेल्यावर्षी रिंकूने नववीत ८१.६० टक्के मिळवले होते. त्यामुळे दहावीतही ती अशीच झिंगाट कामगिरी करेल अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण, काम आणि अभ्यासात समतोल साधून तिने फर्स्ट क्लास मिळवला आहे हेसुद्धा काही कमी नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ०.८२ टक्क्यांनी कमी लागला आहे. कोकण विभागाने ९६.१८ टक्क्यांसह निकालात बाजी मारली आहे. यंदाही मुलींनीच अव्वल स्थान पटकावले आहे. ९१. ४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८६.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. २४ तारखेला दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे.