अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीतील घराणेशाही, गटबाजी, मक्तेदारी यांविषयी अनेक खुलासे झाले. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी पुढाकार घेत याविषयी मोकळेपणाने वक्तव्य केलं तर काहींनी त्यांचे अनुभव सांगितले. असाच एक धक्कादायक अनुभव अभिनेत्री महिमा चौधरीने सांगितला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने इंडस्ट्रीत तिच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला याविषयी खुलासा केला.

१९९७ मध्ये महिमाने ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुभाष घई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं होतं. मात्र त्यानंतर सुभाष घई यांनीच अनेकदा त्रास दिल्याचा खुलासा महिमाने केला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “सुभाष घई यांच्यामुळे मी खूप त्रास सहन केला. त्यांनी मला कोर्टात खेचलं आणि माझा पहिला शो रद्द करायला भाग पाडलं. ते सर्व खूप तापदायक होतं. माझ्यासोबत कोणी काम करू नये यासाठी त्यांनी सर्व निर्मात्यांना मेसेज केले होते. १९९८ किंवा १९९९ मधला ट्रेड गाइड मासिकाचा एखादा अंक पाहिला तर त्यात एक जाहिरात दिली होती. एखाद्याला जर माझ्यासोबत काम करायचं असेल तर आधी त्यांनी सुभाष घईंशी संपर्क साधावा असं त्यात लिहिण्यात आलं होतं. असं न केल्यास तो कराराचा भंग होईल असंही त्यात म्हटलंय. पण मला त्यांची परवागनी घ्यावी लागेल असा कोणताही करार मी त्यांच्यासोबत केला नव्हता. माझ्या बाजूने फक्त चार जण उभे होते. सलमान खान, संजय दत्त, डेविड धवन आणि राजकुमार संतोषी या जणांनी मला खूप पाठिंबा दिला. डेविड धवन यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की तू घाबरू नकोस आणि त्यांना तुला त्रास देण्याची संधी देऊ नकोस. या चौघांव्यतिरिक्त मला कोणाचे फोन कॉल्स आले नाहीत.”

आणखी वाचा : ‘युरोप ट्रिपदरम्यान एक पेंटिंग पाहून घाबरला होता सुशांत’; रियाचा नवा खुलासा

महिमाने बॉलिवूडमध्ये ९०चं दशक गाजवलं होतं. ‘परदेस’ हा तिचा पहिलाच चित्रपट होता. पण नंतर बॉलिवूडमधून तिने अचानक एक्झिट घेतली.