एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहून सर्वजण थक्क झाले होते. एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता सर्वच कलाकारांनी त्यांच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पण, प्रेक्षकांवर असलेली ‘बाहुबली २’ ची क्रेझ काही केल्या कमीच होत नाहीये. बाहुबली या चित्रपटामध्ये कलेचा उत्तम नमुना पाहायला मिळाला खरा. पण, या अफलातून कलाकारांचे फॅन्सही तितकेच अफलातून आहेत.

सोशल मीडियावर बऱ्याचजणांनी ‘बाहुबली २’ विषयीचे ‘मेमे’ आणि काही विनोदी व्हि़डिओ तयार केले आहेत. अशाच काही फोटो आणि व्हिडिओंपैकी एक फोटो अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन रिट्विट् केला आहे. या फोटोमध्ये ‘बाहुबली २’ च्या पोस्टरवर प्रभास आणि अनुष्काच्या चेहऱ्यांऐवजी मराठमोळे कलाकार स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी दिसत आहेत. दानिश शेख या ट्विटर युझरने त्याच्या अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट केल्याचं कळत आहे. या फोटोमध्ये त्याने स्वप्निल आणि सोनीलीलाही टॅग केलं आहे. त्यासोबतच या फोटोमधील कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधत आहे. बाहुबली चित्रपटातील एक संवाद या फोटोमध्ये कॅप्शन म्हणून वापरण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकारही हा फोटो पाहून थक्क झाले असणार यात शंकाच नाही.

दरम्यान, स्वप्निलने हा फोटो पोस्ट करण्यापूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचाही असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हे फोटो एडिट करणाऱ्यांचंही कौतुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्निल बलाढ्य ‘बाहुबली’च्या रुपात कसा दिसेल? आणि मराठीतच बाहुबली हा चित्रपट साकारायचा विचार केला तर देवसेनेच्या रुपात सोनाली त्या भूमिकेला न्याय देऊ शकेल का? असे प्रश्नही सध्या अनेकांच्याच मनात घर करत आहेत. अर्थात हा फक्त विनोदाचाच भाग असून राजामौलींच्या ‘बाहुबली २’ला तोड नाही हेच खरं असं मतही बऱ्याचजणांनी मांडलं आहे.

वाचा: आता मराठीतही येणार ‘बाहुबली’?