गुरुवारची सकाळ ही बॉलिवूडकरांसाठी जरा जास्तच महत्त्वाची होती. जसजसा हा दिवस पुढे गेला तसतशा अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या चर्चा होत्या अभिनेता सलमान खान आणि त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविषयीच्या. काळावीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत त्याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सलमान वगळता या प्रकरणातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या साऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सलमानविरोधात सुनावण्यात आलेल्या या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली. पण, या साऱ्यात एका अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचच लक्ष वेधलं. इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असणारी मॉडेल, अभिनेत्री सोफिया हयात हिने सलमानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

वाचा : सलमान खानला शिक्षा झाल्याचं पाकिस्तानच्या खेळाडूला दु:ख 

इन्स्टाग्रामवरुन सलमानचा एक फोटो पोस्ट करत तिने यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमधून हा आनंद व्यक्त केला. शेवटी कर्माची फळं भोगावी लागतातच. सलमानविरोधात एक शब्दही बोलण्याचं अनेकांचं धाडस होत नाही. कारण, या कलाविश्वावर त्याचीच पकड आहे, असं त्यांना वाटतं. पण, मी त्यांच्यापैकी नाहीये. सलमानने जे कृत्य केलं आणि ज्यामुळे आता तो कारागृहात गेला हे पाहून मला खूपच आनंद झाला आहे. त्याच्याकडे अनेकजण आदर्श म्हणून पाहत असताना तो असं काहीतरी करतोच कसा? आपल्याकडून काहीतरी शिकणाऱ्या चाहत्या वर्गाला तो नेमकं काय शिकवू इच्छितोय? कायद्याने घातलेले नियम मोडत, प्राण्यांची हत्या करण्याविषयी तो शिकवतोय का?’, असे बरेच प्रश्न उपस्थित करत सोफियाने सलमानवर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. कायद्याच्या समोर सगळेच एकसमान असतात हा मुद्दाही तिने अधोरेखित केला.

https://www.instagram.com/p/BhMo5MoF-0S/