बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून, त्याला न्यायालयाने पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सलमानच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळातून निराशा व्यक्त करण्यात आली. अनेकांनीच सलमानविषयी सहानुभूती वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्याच्यासाठी दु:ख वाटत असल्याचं म्हटलं. शेजारी राष्ट्रातील म्हणजे पाकिस्तानमधील क्रिकेटपटू शोएब अख्तर यानेही सलमानला दिलेल्या शिक्षेबद्दल दु:ख व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. ट्विटरच्या माध्यमातून त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

‘माझा जिवलग मित्र सलमान खान याला पाच वर्षांची शिक्षा सुनवण्यात आल्याचं मला दु:ख होत आहे. पण, कायद्याला नजरेत ठेवत घेण्यात आलेल्या निर्णयाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. तरीही सलमानला सुनावण्यात आलेली शिक्षा ही जरा जास्तच असून, त्याच्या कुटुंब आणि चाहत्यांच्या साथीने मी उभा आहे’, असं म्हणत सलमान लवकरात लवकर यातून मोकळा होईल अशी आपल्याला खात्री असल्याचंही शोएब म्हणाला.

सलमान आणि शोएब यांच्या मैत्रीविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘यारो का यार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानचं शोएबशीही घनिष्ट मैत्रीचं नातं आहे. पण, आपल्या मैत्रीखातर हे ट्विट करणं शोएबला महागात पडल्याचंही पाहायला मिळालं. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी लगेचच व्यक्त होण्यास सुरुवात करत त्याला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर सुरु असणारं हे आरोपप्रत्यारोपांचं सत्र आता काही दिवस सुरुच राहण्याचं चित्र आहे.

वाचा : सलमानला गजाआड पाठणाऱ्या बिष्णोई समाजाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

दरम्यान, आता सलमानचं भवितव्य हे कारागृहात जाणार की, जामीनावर सुटका होऊन तो पुन्हा बाहेर येणार याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. जवळपास वीस वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला गुरुवारी न्यायालयाने दोषी ठरवलं. तर यातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि अभिनेता सैफ अली खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.