कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यातील एक गमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्कर पुरस्कार पटकावल्यानंतर लेखक तायका वायतिती तो पुरस्कार त्याच्या समोर बसलेल्याच्या खुर्चीखाली ठेवताना या व्हिडीओत दिसून येतोय. एका अभिनेत्रीनेच तायकाचा हा व्हिडीओ शूट करून ट्विटरवर पोस्ट केला आहे.

एकीकडे मंचावर ऑस्कर पुरस्काराचे वितरण होत असताना दुसरीकडे आपल्या जागेवर बसलेला तायका त्याला मिळालेली ट्रॉफी त्याच्या समोरील खुर्चीच्या खाली असलेल्या जागेत लपवताना दिसत आहे. ब्री लार्सन या अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रॉफी ठेवण्यासाठी खुर्च्यांवर जागा नसल्याने त्याने ती खाली ठेवली असावी असं एका युजरने लिहिलं. तर अनेकांनी हसण्याचे स्माइली पोस्ट केले.

पाहा फोटो : ओळखा कोण आहे हा चिमुकला? ‘चला हवा येऊ द्या’मधून गाजवतोय महाराष्ट्र 

तायका वायतितीला ‘जोजो रॅबिट’ या चित्रपटासाठी रुपांतरित पटकथेचा पुरस्कार मिळाला. तायका हा न्यूझीलंडमधील माओरी वंशाचा लेखक आहे. ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना त्याने उजव्या कट्टरवादावर मार्मिक टिप्पणी केली. “पूर्वी तुम्ही नाझी होता, त्या वेळी तुम्हाला तुरुंगात पाठवले जायचे. आता तुम्ही नाझी असाल, तर खुशाल तुमच्या सहविचारींबरोबर शहरातल्या चौकात मोर्चे काढू शकता”, असं तो म्हणाला.