संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. एकीकडे प्रदर्शनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना चित्रपटाला विरोध वाढतोय. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच भन्साळी यांच्या मुंबईतील जुहू इथल्या कार्यालयाबाहेर पोलीस सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जुहू येथे एकता कपूरच्या बंगल्याजवळच भन्साळींचं कार्यालय आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबई पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा पुरवली आहे. गुरुवारीदेखील कार्यालयाबाहेर १५ ते १६ पोलीस पाहायला मिळाले. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत २४ तास ही पोलीस सुरक्षा तैनात असणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिली.
वाचा : ‘मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांनी त्यांची तत्त्वं सोडली नाहीत’
प्रदर्शनापूर्वी कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी ही सावधगिरी बाळगण्यात आली आहे. यापूर्वी जयपूरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर हल्ला करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भन्साळींना मारहाण केली होती.
This is my tribute to the sacrifice, valour and honour of Rani Padmavati! – Sanjay Leela Bhansali @RanveerOfficial @deepikapadukone @shahidkapoor https://t.co/RfxgTzFtch
— Padmaavat (@filmpadmaavat) November 8, 2017
करणी सेना, राजपूर संघटना आणि काही राजकीय नेत्यांचा चित्रपटाला होणारा विरोध पाहता बुधवारी रात्री भन्साळी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरणसुद्धा दिलं. ‘राणी पद्मिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग किंवा असे दृश्य चित्रीत करण्यात आले नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. १ डिसेंबर रोजी ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.