बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करणाऱ्या ‘बाहुबली २’ फेम अभिनेता प्रभासचा एक जुना चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. कर्नाटक येथील मधापूर पोलीस ठाण्यात प्रभासच्या ‘मिस्टर परफेक्ट’ या चित्रपटाचा निर्माता आणि इतर व्यक्तींच्या विरोधात कॉपी राइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘मिस्टर परफेक्ट’ चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. यात प्रभास व्यतिरिक्त तापसी पन्नू आणि काजल अग्रवाल यांच्याही भूमिका होत्या.

वाचा : सुशांत तिला म्हणतो, ‘तू मला लग्नासाठी आधी का नाही विचारलं’

टॉलिवूड निर्माता दिल राजू आणि अन्य चार व्यक्तींविरोधात कॉपी राइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखिका श्यामला राणी यांनी मियापूर न्यायालयात अर्ज दाखल केला असून, यामध्ये त्यांच्या ‘ना मनसु निन्नू कोरे’ या पुस्तकाच्या कथेवरून ‘मिस्टर परफेक्ट’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचे म्हटलेय. २०१० साली त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. निर्मात्यांनी परवानगी न घेता त्यांच्या पुस्तकावर चित्रपट तयार केल्याचा आरोप श्यामला यांनी केलाय.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्यामला म्हणाल्या की, मी अनेक तेलगू निर्मात्यांना माझ्या ‘ना मनसु निन्नू कोरे’ पुस्तकाच्या कथेचे अधिकार विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कथा कोणीच विकत घेण्यास तयार नव्हते. २०१३ मध्ये टीव्हीवर ‘मिस्टर परफेक्ट’ चित्रपट पाहताक्षणी त्याची कथा माझ्या पुस्तकाच्या कथेशी हुबेहुब मिळतीजुळती असल्याचे माझ्या लक्षात आले. चित्रपटातील अनेक दृश्यं आणि संवाद माझ्या पुस्तकातून घेण्यात आले आहेत.

वाचा : आणखी एक सेलिब्रिटी जोडपे घटस्फोटाच्या वाटेवर

निर्माता दिल राजू यांचे टॉलिवूडमध्ये बरेच मोठे नाव आहे. ‘डीजे दुव्वाडा जगन्नाधाम’ आणि ‘फिदा’ हे या वर्षात प्रदर्शित झालेले त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.