ब्रिटनमधल्या राजघराण्यात सध्या प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. जगभरातील मोजक्याच आणि प्रतिष्ठित व्यक्तींना या विवाहसोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या शाही विवाहसोहळ्याविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतानाच आता एक नवीनच माहिती समोर येत आहे. ‘द गार्डीयन’ने दिलेल्या वृत्तानुसार, १९ मे रोजी विंडसर कॅसल इथं पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यात हजेरी लावणाऱ्या काही पाहुण्यांना घरूनच जेवणाचा डबा आणण्यास सांगण्यात आलं आहे.

एकूण २६५० पाहुण्यांपैकी १२०० पाहुणे हे जनसामान्यांमधून असणार आहेत. राणीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नऊ प्रांतातील शिष्टमंडळाने ही पाहुण्यांची यादी तयार केली आहे. तर प्रिन्स हॅरी आणि मेगननंसुद्धा काही पाहुण्यांची निवड केली आहे. ‘द केन्सिग्ट्ंन पॅलेस’नं जाहीर केल्यानुसार, विभिन्न पार्श्वभूमी आणि वयोगटातील हे काही पाहुणे असून त्यात बहुतांश तरुणांचा समावेश आहे. आपापल्या समाजात उल्लेखनीय कामगिरी आणि नेतृत्व करणारे हे लोक मुख्य लग्नसमारंभाला उपस्थित राहणार नाहीत. विवाहस्थळी जोडपं बग्गीतून येताना आणि जातानाच ते पाहू शकतील. तर सेंट जॉर्ज चॅपल चर्चबाहेर उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना घरूनच जेवणाचा डबा आणण्यास सांगितलं गेलं आहे. या पाहुण्यांच्या उपहाराची सोय फक्त राजघराण्याकडून करण्यात येणार आहे.

Video: मेहंदी कार्यक्रमात सोनम- आनंदचा धम्माल डान्स

शाही विवाहसोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांचं योग्य प्रकारे आदरातिथ्य होत नसल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. घरून जेवणाचा डबा आणण्यास सांगणं हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. चर्चमध्ये उपस्थित राहणारे ६०० पाहुणेच विवाहभोजनाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत.