प्रिया वारियर हे नाव आता अनेकांच्याच परिचयाचं झालं आहे. या मल्याळम अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि ती प्रकाशझोतात आली. प्रियाने तिच्या हावभावांनी अनेकांनी मनं जिंकली. तिच्या नावावरुन सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. एका दिवसात इन्स्टाग्रामवर ६ लाख फॉलोअर्स मिळवणाऱ्या आणि फॉलोअर्सच्या आकड्यात मार्क झकरबर्गलाही मागे टाकणाऱ्या या प्रियाचे उदाहरण आता आयआयटी मुंबईच्या एका परीक्षेत देण्यात आले आहे.

‘नेक्स बिग व्हॉट डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार आयआयटी मुंबईतील ‘मशिन लर्निंग कोर्स’च्या सहामाही परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नात प्रियाचे उदाहरण देण्यात आले आहे. कमी वेळात प्रियाला मिळालेल्या प्रसिद्धीचा उल्लेख या प्रश्नात करण्यात आला आहे. तर प्रश्नातील प्रियाचा उल्लेख आमच्यासाठी आश्चर्यकारक नसल्याची प्रतिक्रिया आयआयटी मुंबईतील काही विद्यार्थ्यांनी दिली. सोशल मीडियावरील प्रसिद्ध मीम्सची उदाहरणं ही बऱ्याचदा शिकवताना दिली गेली आणि त्यामुळे तो विषयसुद्धा समजण्यात मदत झाल्याचं या विद्यार्थ्यांनी म्हटलं.

वाचा : मार्चमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर फक्त एका गाण्यामुळे इतकी प्रसिद्ध होईल याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या प्रियाच्या फॉलोअर्सचा आकडा झपाट्याने वाढला.