बॉलिवूडचा अतरंगी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंग याने शाहरुख, सलमान, आमिर या तिनही खान कलाकारांना मागे टाकले आहे. कारण, भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यावर आधारित चरित्रपटात रणवीरची वर्णी लागली आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर हा कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसेल.

वाचा : Khatron Ke Khiladi Season 8 ‘खतरो के खिलाडी ८’च्या विजेत्याचे नाव लीक

प्रसिद्ध व्यापार समीक्षक तरण आदर्श यांनी आज सकाळी ट्विट करून ही माहिती दिली. ‘#BreakingNews: क्रीडा विषयावर आधारित असलेल्या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत दिसेल’, असे ट्विट त्यांनी केले असून, त्यास #1983 #WorldCup हे हॅशटॅग्जही दिले आहेत. हा चित्रपट १९८३ सालच्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित असल्याचे या ट्विटवरून स्पष्ट होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात कपिल देव यांनी विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी, भारताने विश्वविजेता राहिलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले होते.

अनेक नवोदित आणि युवा खेळाडूसांठी कपिल देव हे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे भारताच्या या यशस्वी कर्णधारावरील चित्रपटात रणवीर कशाप्रकारे भूमिका साकारतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

वाचा : CONFIRMED ‘हे’ दोन सेलिब्रिटी दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात

दरम्यान, रणवीर लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसेल. ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होईल.