बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा सध्या अक्षय कुमारच्या 'टॉयलेट- एक प्रेम कथा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये आणि 'पद्मावती' सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. रणवीरला चर्चेत राहण्यासाठी फार काही करावं लागत नाही. प्रचंड उत्साही असणारा रणवीर सहज फिरायला म्हणून बाहेर पडला तरी त्याच्या भोवती प्रसारमाध्यमांचा गराडा होतो. असा हा अतीउत्साही रणवीर त्याच्या आगामी सिनेमात कतरिना कैफसोबत काम करणार असल्याच्या चर्चा आहेत. तो 'नटखट नंदलाल' आता असा दिसतो 'पद्मावती' सिनेमानंतर रणवीर झोया अख्तरच्या 'गली बॉय' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. पण आता 'बॉलिवूड लाइफ' या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लवकच रणवीर रोहित शेट्टीच्या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात तो दिसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, 'हो हे खरंय की आम्ही एकत्र काम करणार आहोत. जे खरंय ते सांगायला काहीच हरकत नाही. हा एक अॅक्शनपट असणार आहे. पण सध्या तो 'पद्मावती'मध्ये आणि त्यानंतर झोयाच्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे पुढच्यावर्षी मे- जूनच्या दरम्यान आम्ही चित्रीकरणाला सुरूवात करू.' याच सिनेमात रोहित कतरिना कैफला घेण्याचा विचार करत आहे. रोहितचा हा सिनेमा तेलुगु सिनेमा ‘टेंपर’ चा रिमेक असणार आहे. कतरिनाचा शेवटचा सिनेमा रणबीर कपूरसोबत 'जग्गा जासूस' हा होता. याशिवाय येत्या काळात कतरिनाचे अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ती आमिर खानसोबत 'ठग्ज ऑफ हिंदोस्थान', सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है' आणि शाहरुख खानसोबतही एका सिनेमात दिसणार आहे. या बॉलिवूडच्या तीनही खानसोबत काम केल्यानंतर ती रणवीरसोबत रोमान्स करतानाही दिसू शकेल. पण या सगळ्यामध्ये तिचे नाव अजूनही निश्चित झाले नाही याचे मुळ कारण दीपिका पदुकोण असल्याचे म्हटले जाते. रणबीर कपूर आणि दीपिका यांच्या ब्रेकअप मागे कतरिनाचा हात होता. तेव्हा पासून दीपिका आणि कतरिना यांच्यात विस्तवही जात नाही. या दोघी नेहमीच एकमेकींपासून दोन हात लांबच असतात. अशावेळी रणवीर तिच्यासोबत काम करणार हे दीपिकाला किती पटेल याची शंकाच आहे. त्यामुळे या सिनेमात कतरिना काम करणार की नाही याबद्दल अजून काहीच निश्चित झाले नाही. पण सिनेमात तुम्हाला ही नवीन जोडी पाहायला आवडेल की नाही ते नक्की सांगा.