‘दोस्ती- यारी एक तरफ और हिसाब- किताब दुसरी तरफ’ असा एक व्यवहारी दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच आदर्श सिनेविश्वासमोर ठेवला. केवळ बॉलिवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण, टायगर श्रॉफ मात्र स्वत:च्या चित्रपटाचे प्रमोशन सोडून सध्या एका मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे.

३० मार्चला टायगर श्रॉफचा बहुचर्चित ‘बागी-२’ आणि मराठीत आर.बी. प्रोडक्शनची निर्मिती असणारा ‘गावठी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘गावठी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ ‘ॲण्डी’ हा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डीसोजा यांचा सहायक आहे. रेमोच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘फ्लाईंग जाट’ या चित्रपटाच्या वेळी टायगर डान्सस्टेप आणि काही दृश्यं समजावून सांगण्याची जबाबदारी ॲण्डीवर सोपवण्यात आली होती. त्याने ही जबाबदारी लिलया पेलली होती. तेव्हापासूनच टायगरसोबत त्याची मैत्री झाली आणि दिवसागणिक या दोघांच्याही मैत्रीचं नातं आणखीनच दृढ झाले.
‘फ्लाईंग जाट’ येऊन गेला पण टायगरने ॲण्डीशी मैत्री कायम ठेवली. ॲण्डीने एक मराठी फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि ती उत्तम झाल्याचे टायगरला रेमो डिसोजाकडून समजले तेव्हा त्याने फोन करून ॲण्डीचे अभिनंदन केले.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

गुरूस्थानी असलेल्या रेमो डिसोजा सरांच्या हस्ते पहिले गाणे प्रकाशित झाल्यानंतर टायगरच्या हस्ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि दुसरे ‘भन्नाट’ हे गाणे प्रकाशित व्हावे, अशी ॲण्डीची मनोमन इच्छा होती. परंतु, गावठी आणि बागी-२ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने आता टायगर आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार नाही, हे मनाशी धरून ॲण्डीने टायगरकडे कधी विचारणा केली नाही. पण, टायगरने एखादे ट्वीट किंवा शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीयो अपलोड करावा, या हेतूने ॲण्डीने टायगरला एक फोन केला. बोलण्याच्या ओघात ॲण्डीने त्याच्या मनातील खरी इच्छा टायगरला सहज बोलून दाखवली. तेव्हा टायगरने ट्रेलर आणि दुसरे गाणे लाँच करण्यासाठी लगेच होकार दिला. त्याच्या होकारानंतर मुंबईत एका भव्यदिव्य सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते ‘गावठी’चा ट्रेलर रिलिज करण्यात आला. इतकंच नव्हे, तर टायगर आणि बॉस्को ने‘भन्नाट’ या आयटम साँगवर ॲण्डीसोबत ठेकाही धरला.

पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग

टायगरने निभावलेली मैत्री आणि व्यक्त केलेल्या प्रेमामुळे ॲण्डीसोबतच ‘गावठी’ची संपूर्ण टीम भारावून गेली. दिलदार टायगर श्रॉफच्या स्वभावाचा हा पैलू अनेकांनाच भावला. ‘गावठी’ हा शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आत्मविश्वास प्रत्येकाला निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून देणारा हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.